@vivekbhavsar

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस. ठाकरे यांनी राज्याची धुरा हाती घेऊन आता जवळपास पावणेदोन वर्षे झाली. या काळात त्यांनी कसा राज्य कारभार केला आणि यापुढील काळात त्यांच्यापुढे काय आव्हान असतील याचा आजच्या दिवशी आढावा घेतला तर अनुचित ठरणार नाही.

शिवसेना पक्षाचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि त्या दिवसापासून त्यांच्या नावामागील पक्षप्रमुख हे बिरुद गळून पडले. जबाबदारी वाढली आणि सगळा महाराष्ट्र, सर्वपक्षीय आमदार, नेते, कार्यकर्ते यांच्या पालकत्वाची भूमिका ठाकरे यांना स्वीकारावी लागली.

मुख्यमंत्री (CM) हे पद धारण करण्यापूर्वी असलेली दिनचर्या बदलावी लागली. सकाळ, संध्याकाळ महापौर बंगल्यात walk घेणे थांबले, सुरक्षा कडे आणखी कठोर झाले. दिवसभरात केवळ पक्षाच्या काही नेत्यांशी भेटी- गाठी, राज्यातुन येणाऱ्या शिवसैनिकांना भेटणे आणि निवडणूक काळात दौरे करणे, इतपर्यंत मर्यादित असलेल्या आयुष्यात अचानक बदल झाले.

जवळपास तीन तप मुंबई महापालिकेत सत्ता असूनही उद्धव ठाकरे कधी नियमितपणे महापालिकेत (BMC) गेल्याचे आठवत नाही. पण मुख्यमंत्री झाल्यावर तुम्हाला रोज मंत्रालयात जावे लागेल, बैठका घ्याव्या लागतील, दौरे करावे लागेल, याची जाणीव होते ना होते तोच कोरोना साथ पसरली आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मातोश्रीत बसून राज्यशकट चालवणे पसंत केले. त्याबद्दल त्यांच्यावर प्रचंड टिकाही झाली.

मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यावर पहिल्यांदा मंत्रालयात आलेल्या उद्धव ठाकरे यांचे सरकारी कर्मचाऱ्यांकडून अभूतपूर्व स्वागत झाले होते. असे भाग्य यापूर्वी कुठल्या मुख्यमंत्र्याला लाभले नसावे. शिवसेनेसारखा पक्ष चालवण्याचा दांडगा अनुभव असलेले आणि २०१४ च्या निवडणुकीत भाजपने ऐनवेळी दगा फटका करूनही एकहाती ६३ आमदार निवडून आणून बाळासाहेबांच्या पश्चात त्यांचा पुत्र सेनेचा वाघ असल्याचे तुम्ही सिध्द केले होते.

हे मुख्यमंत्री अधिकाऱ्यांना कसे समजून घेतात, शांतपणे विषय समजून घेतात, प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेतात असे कौतुक करतांना अधिकारी कर्मचारी थकत नव्हते….
पण..

हा पण महत्वाचा आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी मुख्यमंत्री पदाची खुर्ची म्हणजे काट्याचे सिंहासन ठरले आहे. अगदी सुरवातीला गारपीट आणि त्यांनतर कोरोना – यातून उसंत घ्यायला वेळ नाही अशी ठाकरे यांची अवस्था झाली आहे. 

झोकुन देऊन काम करणे काय असते हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)आणि भाजप नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी वारंवार सिद्ध केले आहे. पवार तर या वयात आणि शारीरिक मर्यादा असतांनाही ज्या पद्धतीने धावपळ करत असतात, मिटींग घेतात, नैसर्गिक आपत्तीत त्या गावात जाऊन जनतेला भेटतात, ते आजही अचंबित करणारे आहे. हीच बाब देवेंद्र फडणवीस यांना लागू होते. वेळ, काळाचे बंधन न पाळता फडणवीस काम करत होते आणि आताही करतात. या व्यस्त दिनचर्येतून राज्यभरातून आलेल्या जनतेच्या मोबाईल मेसेजला उत्तर देणे कधी त्यांनी टाळले नाही.

त्यामुळे पवार किंवा फडणवीस यांच्याशी ठाकरे यांची तुलना होऊ शकत नाही. पण, आता त्यांना या सवयी बदलाव्या लागतील. तुम्हाला गाडी चालवणे आवडते म्हणून पाच- सहा तास गाडी स्वतः चालवत नेणे याचे कौतुक असले तरी मुख्यमंत्री म्हणून तुमच्यासाठी एक एक मिनिटं महत्वाचा आहे. त्याचा जनतेसाठी सदुपयोग करा. तुम्ही जनतेसाठी असलेल्या वेळेचा दुरुपयोग करत आहात, असेच म्हणावे लागेल.

मातोश्रीवर (Matoshree) बसून मुख्यमंत्री राज्याचे प्रश्न सोडवत असतात हे वाक्य प्रवक्त्यांच्या तोंडी घालायला ठीक आहे. पण, मंत्रालयात जा, समोर बसून बैठका घ्या, त्यातून प्रशासन आणि जनतेचा धीर वाढेल. राजाच कोरोनाला इतका घाबरत असेल तर प्रजेने कोणाकडे बघावे?
ठाकरे साहेब, तुम्हाला गड किल्ले, पर्यावरण, जंगल यात जास्त स्वारस्य आहे. आम्हाला तुमचे कौतुक वाटते की आमचा मुख्यमंत्री याबतीत खूप संवेदनशील आहे. पण शेतकऱ्यांचे प्रश्न ही तेवढेच महत्वाचे आहेत, हे तुमच्या कधी लक्षात येणार?

असे सांगितले जाते की मंत्रिमंडळ बैठकीत तुमच्या आवडीचे विषय नसले की तुम्ही मोबाईलवर चाट करत बसतात आणि केवळ पर्यावरण, जंगल असे विषय आले की कान देऊन ऐकतात आणि मत मांडतात. असे असेल तर ही बाब गंभीर आहे. विषय समजत नसेल तर समजून घ्या पण दुर्लक्ष करू नका.

तसे नसते तर राज्यस्तरीय बँकिंग समितीच्या बैठकीत राष्ट्रीयकृत बँकांनी तुम्हाला सहज गुंडाळले नसते. शेतकऱ्यांसाठी खत, बी बियाणे, कर्ज पुरवठा यासंदर्भात या बैठकित वार्षिक पतपुरवठा आराखडा निश्चित केला जातो. यावर्षी हा आराखडा ४ हजार कोटी रुपयांनी कमी असतांनाही मंजूर केला गेला आणि ते ही तुम्ही त्या बैठकीच्या अध्यक्षतेस्थानी असतांना? तुम्हाला विषय कळला नसेल पण त्याचा थेट फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला आहे.

तुमचे सुपुत्र आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे याबाबत जास्त संवेदनशील आहेत ही जमेची बाजू आहे. शांतपने विषय समजून घेणे, अधिकाऱ्यांचा आदर करणे, स्वतः अभ्यास करणे ही तुमच्यासाठी आणि राज्यासाठी जमेची बाजू आहे. त्याहून जास्त महत्वाचे म्हणजे बाप आणि पुत्र यातील bonding अभिमानास्पद आहे. प्रत्येक वेळी पुढे येऊन तुमच्या हातावर सॅनिटायजर देणे, सावलीसारखे सोबत राहून काळजी घेणे, यातून तुम्ही सुरक्षित आहात, हाच संदेश जातो.
बस एकच करा, सातच्या आत घरात आणि घरचेच जेवण ही सवय सोडा आणि झोकून देऊन काम करा. रोज मंत्रालयात येवून काम करा म्हणजे प्रशासन ही कामाला लागेल. असे केले तर तुम्ही सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री आहात हे संगण्यासाठी कुठल्याही PR कंपनीची गरज भासणार नाही.
पुन्हा एकदा वाढदिवसाच्या पुन्हा शुभेच्छा!

विवेक भावसार
संपादक
महाराष्ट्रसिटी
(maharashtra.city)
मोबाईल – ९९३०४०३०७३

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here