@maharashtracity
मुंबई: मुंबईत (Mumbai) पुढील दोन दिवसांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ (Orange alert) देण्यात आला होता. आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू होती. काही भागात मुसळधार पाऊस बरसला आहे. सकाळी ९.५२ वाजता समुद्राला मोठी भरती होती. त्यामुळे समुद्रात चार ते साडेचार उंचीच्या लाटा उसळत होत्या. सायन, किंग्जसर्कल, हिंदमाता, अंधेरी येथील सखल भागात अगदी कमी प्रमाणात पाणी साचले होते. मात्र, मिठी नदी तुडुंब भरल्याने नदी परिसरातील झोपडपट्टीतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याचे समजते. तर तिन्ही मार्गांवरील रेल्वे सेवा व रस्ते वाहतूक सुरळीत होती. त्यामुळे मुंबईकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
आज मुस्लिम बांधवांची ‘बकरी ईद’ असल्याने त्यांनाही जोरदार पाऊस न पडल्याने आणि मुंबई जलमय न झाल्याने मोठा दिलासा मिळाला.
दरम्यान, मुंबईत बुधवारी सकाळी ८ ते दुपारी १२ या चार तासांच्या कालावधीत शहर भागात – ४४.४ मिमी, पश्चिम उपनगरात – ४१.० मिमी तर पूर्व उपनगरात – ४६.८ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. मात्र दुपारी १ नंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती.
पुढील २४ तासांत शहर व उपनगर परिसरात मध्यम ते जोरदार आणि काही ठिकाणी अति जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
मुंबईत आतापर्यंत ६०.४९ टक्के पाऊस
मुंबईत ९ जूनपासून पावसाळा सुरू झाला. तेव्हापासून ते आजपर्यंत (२१ जुलैपर्यंत) मुंबईत ६०.४९ टक्के इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
यामध्ये, शहर भागात – १,३९०.९२ मिमी (६०.६१ टक्के) , पश्चिम उपनगरात – १,६५१.६४ मिमी तर पूर्व उपनगरात -१,४९२.२६ मिमी इतक्या म्हणजेच दोन्ही उपनगरात मिळून ५८.१३ टक्के इतक्या पसवसाची नोंद झाली आहे.
पवई, विहार, तुळशी तलावांत पाऊस
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी तुळशी (Tulsi lake) व विहार (Vihar Lake) हे कमी पाणीसाठा क्षमता असलेले तलाव भांडुप संकुल परिसरात आहेत. हे दोन्ही तलाव सध्या भरलेले आहेत. तर पिण्यायोग्य पाणीसाठा नसलेला पवई तलाव (Powai lake) सर्वात अगोदरच भरला आहे. त्यामुळे या तिन्ही तलावांत चांगला पाऊस पडला आहे. परिणामी या तिन्ही तलावांत काही प्रमाणात पाऊस पडला.