@maharashtracity
मुंबई:भायखळा येथील श्री लक्ष्मी रेसिडेंसी या म्हाडाच्या अखत्यारीत येणाऱ्या पुर्नविकास योजनेत (Redevelopment) १२ वर्षानंतर सहा रहिवाशांना हक्काची सदनिका मिळाली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.
गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड, आमदार यामिनी जाधव, गृहनिर्माण विभागाचे तत्कालीन
प्रधान सचिव एसव्हीआर श्रीनिवास, म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर आणि मुंबई दुरुस्ती मंडळाचे मुख्य अधिकारी अरुण डोंगरे यांनी विशेष सहकार्य केले. गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांनी न्याय मिळवून दिला असल्याची भावना व्यक्त करत रहिवाशांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेत आभार मानले.
१२ वर्षांपासून सदनिकेपासून वंचित असलेले गणेश बाळ सराफ, नंदकिशोर जाधव, महेंद्र शाह, रमेश गायकवाड, प्रकाश बो-हाडे, प्रभाकर घारमळकर या रहिवाशांना नुकतीच हक्काची सदनिका विकासक क्षितिजा इन्फ्रास्ट्रक्चर आणि सोसायटीतर्फे ताब्यात देण्यात आल्या आहेत.
रहिवाशांनी आभार पत्रात उल्लेख केला आहे की अनिल गलगली यांनी कोठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता सहकार्य केले. मागील १२ वर्षांपासून रखडलेला आमचा प्रश्न मार्गी लावला. पत्रात पुढे असे नमूद केले आहे की आपल्यामुळे आम्हां 6 रहिवाशांना न्याय मिळाला. नि:स्पृह भावनेने आपण केलेली मदत आम्ही कधीही विसरणार नाही. अनिल गलगली (Anil Galgali) यांच्या पुढाकाराने गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांनी मंत्रालयात बैठक आयोजित करत याबाबतीत दिलेल्या निर्देशानंतर प्रत्यक्षात कार्यवाही सुरु झाली आणि 6 रहिवाशांना न्याय मिळाला.