X : @Rav2Sachin
मुंबई: मुंबई अग्निशमन दलाच्या अग्निशामक भरती (recruitment in fire fighter department) घोटाळ्याची सीबीआय चौकशीची (CBI probe) मागणी भरतीतील उमेदवारांनी केलेली आहे. यासंदर्भातील निवेदन नुकतेच त्यांनी भायखळा येथील प्रमुख अग्निशमन अधिकारी यांच्या कार्यालयात दिलेले आहे.
अग्निशामक पदाची भरती प्रक्रिया संपल्यानंतरही पालिका आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी – जवान बनावट भरती प्रक्रियेचे रॅकेट चालवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यामध्ये ६१ जणांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणात आग्रीपाडा ठाण्यात मुख्य लिपिक मनीष पाटील, लिपिक रुपेश पाटील, अग्निशामक दत्तात्रय पवार, यंत्र चालक देविदास वाघमारे आणि पालिका सुरक्षा रक्षक मल्हारी शिंदे या पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. तसेच पालिकेचे टाहो विभाग ( टेस्ट अँड ऑडिट व्हिजीलन्स ऑफिसर ) आणि प्रशासन अधिकारी यांच्या तर्फे चौकशी सुरु करण्यात आलेली आहे.
निवेदनाच्या माध्यमातून भरतीतील इच्छुक उमेदवारांनी चौकशीसंदर्भात काही मागण्या केल्या आहेत. त्यात त्यांनी उल्लेख केला आहे की, मुख्य लिपिक याने कागदोपत्री फेरफार घोटाळा केल्याने निवड झालेल्या उमेदवारांची छाती, उंची आणि कागदपत्रांची सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच मैदानी गुण व प्रत्यक्ष गुणपत्रकावरील खाडाखोड तपासण्यात यावी.
दरम्यान, भविष्यात आम्हाला कायदेशीर अडचणी येऊ नये आणि भरतीत आम्हाला डावलले जाऊ नये यासाठी आम्ही निवेदन निनावी दिलेले आहे, असेही निवेदन देणाऱ्या भरतीतील उमेदवाराने maharashtra.city शी बोलताना सांगितले.