शिक्षक भारतीचे सुभाष मोरे यांच्या प्रयत्नाना यश
X : @milindmane70
मुंबई – लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी संपते न संपते तोच राज्यातील विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक आयोगाने पदवीधर (Graduate constituency) आणि शिक्षक मतदार संघाच्या (Teacher’s constituency) निवडणुकीच्या कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष किशन मोरे व शिक्षक मतदार संघाचे आमदार कपिल पाटील यांनी दिल्लीत जाऊन भारतीय निर्वाचन आयोगाकडे (Election Commission of India) केलेल्या मागणीला यश आले असून तूर्त केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निवडणुकीचा कार्यक्रम मागे घेतला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदार संघातील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार १० जून रोजी या निवडणुका पार पाडणार होत्या. मात्र लोकसभा निवडणुकीकरता ज्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी नेमले होते, ते सुट्टीवर जाणार होते, त्यामुळे ते प्रत्यक्ष निवडणुकीला हजर राहू शकले नसते.
राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने २ मे ते १४ जून पर्यंत सुट्टीचा कालावधी जाहीर केला आहे. १५ जून नंतर राज्यात शाळा शाळा पूर्ववत भरणार आहेत. त्यातच १७ जून ते २० जूनपर्यंत बकरी ईद निमित्त उर्दू माध्यमाच्या शाळांना सुट्टी असते. मुंबईतील शिक्षक पदवीधर मतदार संघातील उत्तर भारतीय शिक्षक ११ जून २०२४ रोजी मुंबईत परतणार आहेत. तसेच अनेक शिक्षक निवडणुकीच्या कामानंतर आपापल्या मूळ गावी सुट्टीवर जाणार आहेत. त्यामुळे ते मतदानापासून वंचित राहू शकत होते, ही बाब लक्षात घेऊन शिक्षक भारतीच्यावतीने निवडणूक आयोग व हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.
अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील दोन पदवीधर व दोन शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम तुर्त पुढे ढकलला आहे. त्याबाबतचे परिपत्रक केंद्रीय निवडणूक आयोगाचे सचिव सुमन कुमार दास यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे शिक्षक मतदार संघातील व त्याबरोबरच पदवीधर मतदार संघातील निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलला गेला आहे.
राज्यातील शिक्षक व पदवीधर मतदार संघातील ज्या रिक्त जागांसाठी निवडणुका होत आहेत, त्या आमदारांचा कार्यकाळ ७ जुलैला संपत आहे. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील या चार जागांसाठी १० जूनला मतदान होणार होते.
राज्य विधिमंडळाच्या विधान परिषदेतील एकूण सदस्यांपैकी ७ सदस्य शिक्षक तर ७ सदस्य पदवीधर मतदारसंघातून निवडून जातात. त्यातील २ पदवीधर आणि २ शिक्षक मतदार संघातील रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम जाहीर केला होता. या कार्यक्रमानुसार १३ जूनला मतदान मतमोजणी होणार होती. यासाठी १५ मे पासून निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार होती व २२ मे पर्यंत इच्छुक उमेदवारांनी आपले नाम निर्देशन पत्र दाखल करावयाचे होते. उमेदवारांच्या अर्जाची छाननी २४ मे रोजी होणार होती तर २७ मे पर्यंत उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज मागे घेता येणार होते.
मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडून गेलेले विलास विनायक पोतनीस व कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडून गेलेले निरंजन वसंत डावखरे, तर नाशिक शिक्षक मतदार संघातून किशोर भिकाजी दराडे व मुंबई शिक्षक मतदार संघातून कपिल हरिश्चंद्र पाटील या आमदारांचा कार्यकाळ समाप्त होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने तूर्तास या चारी जागांचा निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलला असून लोकसभेच्या निवडणुकीचे सर्व टप्पे समाप्त झाल्यानंतर पुन्हा या चार जागांसाठीच्या निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोग जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.