X : @milindmane70
महाड: लोकसभा निवडणुक प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे राजकीय पक्षांबरोबर महसूल व पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. मात्र राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे दक्षिण रायगडमध्ये खेडोपाड्यापासून राष्ट्रीय महामार्ग ते राज्य मार्ग व ग्रामीण मार्ग ते गल्लीबोळ्यात टपऱ्यांवर खुलेआमपणे दारू विक्रीचे धंदे जोमाने चालू आहेत. ज्या ठिकाणी गार्डन रेस्टॉरंट नाही, अशा ठिकाणी देखील हॉटेल बाहेरील बगीच्यामध्ये मद्य प्राशन करण्यास मुभा दिली जात आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात केला असून नाक्या – नाक्यावर वाहनांच्या तपासणीचे काम सुरू आहे. तरी देखील ग्रामीण भागात आणि विविध ठिकाणी खुलेआम मद्य विक्री होत आहे. राजरोजपणे दारू विक्री करणाऱ्यांना राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांचे अभय असल्याने राष्ट्रीय महामार्गावरील धाबे व गार्डन रेस्टॉरंट यांच्यावर खुलेआमपणे दारू विक्री केली जात आहे. त्याचबरोबर राज्य मार्ग, राष्ट्रीय महामार्ग ते ग्रामीण महामार्गावरील चायनीज सेंटरवर, स्टीलच्या ग्लासमध्ये दारू पिण्याचे प्रकार सर्वत्र पाहण्यास मिळत आहे.
अवैध दारू विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर तातडीने कारवाई करण्याचे काम राज्य उत्पादन शुल्क खात्याचे अधिकाऱ्यांचे आहे. मात्र मागील सहा महिन्यात एकाही अनधिकृत दारू विक्रेत्यावर व चायनीज सेंटरवर दारू विकणाऱ्या व गार्डन रेस्टॉरंटवर अनधिकृत दारू विक्रेत्यांवर कारवाई केल्याची नोंद नाही. केवळ लाखो रुपयांचा मलिदा अनधिकृत दारू विक्रेत्यांकडून राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांना मिळत आहे. त्यामुळे दक्षिण रायगडमधील श्रीवर्धन, माणगाव, तळा, रोहा, महाड, पोलादपूर या तालुक्यात जागोजागी दारू विक्रेत्यांनी उच्छाद मांडला आहे. याबाबत अनेक नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करून देखील याबाबत कोणतीही कारवाई करण्याचे काम राज्य उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी करीत नाहीत.
आमच्याकडे अपुरे संख्याबळ आहे, एवढेच कारण सांगून अनधिकृत दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे ते टाळत आहेत. मात्र याच विक्रेत्यांकडून महिन्याकाठी लक्ष्मी दर्शन करण्याचे सत्र थांबवत नाहीत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावोगावी खेडोपाडी दारू विक्रेत्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वाद होण्याचे प्रसंग घडण्याची शक्यता असताना राज्य उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी मात्र झोपी गेल्याचे सोंग करत आहेत.
वाईन शॉप, विक्रेत्यांवर कारवाई कधी?
दक्षिण रायगड जिल्ह्यातल्या अनेक गावात अनधिकृतरित्या विकली जाणारी दारू ही वाईन शॉपमधून खरेदी केली जाते. वाईन शॉपमध्ये खरेदी करून आणत असताना त्या विभागातील पोलीस यंत्रणेला याची पूर्ण कल्पना असते. मात्र एखाद्या दारू विक्रेत्याकडे दारू प्राशन करण्याचा परवाना नसल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करणे गरजेचे असताना अनधिकृतरित्या गार्डन हॉटेल्स, उपाहारगृहे व चायनीज सेंटरवर दारू विकणाऱ्या व दारू प्राशन करणाऱ्या मद्यपींवर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचप्रमाणे अनधिकृतरित्या वाईन शॉपमधून मोठ्या प्रमाणावर दारू वाहतूक केली जाते, हे राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांना पूर्णपणे माहीत असताना ते त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का करतात असा सवाल नागरिक विचारत आहेत. राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाच्या धोरणामुळे लोकसभा निवडणुका सुरळीत पार पाडतील का अशी शंका व्यक्त केली जात आहे.
याबाबत महाड येथील राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या निरीक्षक कार्यालयात चौकशी केली असता या ठिकाणचे निरीक्षक कोळसे जागेवर उपलब्ध नव्हते, कुठे गेले आहेत याबाबत विचारणा केले असता पाटील नावाच्या अधिकाऱ्याने उडवा उडवीची उत्तरे देऊन साहेब आल्यावर या, येथील कार्यालयातले छायाचित्रण करू नये, असे उद्धट भाषेत उत्तर देऊन माहिती देण्यास नकार दिला.