ठेकेदारांकडून अग्निशमन दलाच्या वाहनांची होतेयं दुरुस्ती
मुंबई: एकीकडे तांत्रिक ज्ञान नसलेले उपप्रमुख अग्निशमन अधिकारी अग्निशमन वाहनांची जबाबदारी सांभाळत आहेत तर दुसरीकडे कामगार – अभियंतांच्या रिक्त जागा न भरता आणि आहे त्या कामगारांच्या हाताला कामही न देता ठेकेदारांकडून वाहनांची दुरुस्ती केली जात आहे. अग्निशमन दलात असा अजब कारभार सुरु असला तरी गेल्या 10 ते 12 वर्षांपासून कामगार आणि अभियंतांच्या रिक्त जागा भरण्यात आल्या नाहीत.
मुंबईत अग्निशमन दलाचे 35 अग्निशमन केंद्र आहेत. अग्निशमन केंद्रात अग्निशमन वाहन, वॉटर टँकर, जीप तसेच आपत्कालीन वाहन आणि शिडी मशीन वाहन सोबत अधिकाऱ्यांचे वाहन असतात. या प्रत्येक वाहनांची दुरुस्ती करण्यासाठी अग्निशमन दलात भायखळा, मरोळ आणि मानखुर्द अशा तीन वाहन दुरुस्ती कार्यशाळा (वाहन दुरुस्ती गॅरेज) आहेत.
मानखुर्द येथील वाहन दुरुस्ती कार्यशाळा उभारण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करुनदेखील कामगार अभावी बंद ती आहे. तर मरोळ येथील वाहन दुरुस्ती कार्यशाळेकडे उपनगरातील अग्निशमन दलाच्या वाहनांची दुरुस्ती सोपविण्यात आली आहे. मुंबई शहरातील वाहनांची दुरुस्तीची जबाबदारी भायखळा येथील वाहन दुरुस्ती कार्यशाळेकडे आहे.
2006 ते 2007 च्या पूर्वी मुंबई अग्निशमन दलाच्या संपूर्ण वाहनांची दुरुस्ती भायखळा आणि मरोळ येथील वाहन दुरुस्ती कार्यशाळेत केली जात असे. त्यावेळी कार्यशाळेत पुरेसे मनुष्यबळ होते. पुढे वाहन दुरुस्ती कार्यशाळेतील कामगार आणि अभियंतांची पदे रिक्त होत गेली, मात्र ही रिक्त पदे आजपर्यंत भरली गेली नाहीत.
वाहनांची दुरुस्ती करण्यासाठी भायखळा आणि मरोळ येथील वाहन दुरुस्ती कार्यशाळेत 125 जणांच्या स्टाफची (अभियंता आणि कमगार) आवश्यकता असताना 70 पदे रिक्त आहेत. या कार्यशाळेत यांत्रिकी आणि इलेक्ट्रिकल अभियंतांची पदे रिक्त आहेत. कनिष्ठ अभियंता, दुय्यम अभियंता, सहाय्यक अभियंता आणि कार्यकारी अभियंता पदाच्या जागा आहेत. यातील कार्यकारी अभियंता पदावरील अभियंता हे भायखळा आणि मरोळ वाहन दुरुस्ती कार्यशाळेचे कामकाज पाहत असले तरी ते स्वतःच हंगामी पदावर कार्यरत असल्याचे सांगितले जाते.
दोन्ही कार्यशाळेत मिळून सहाय्यक अभियंता पदाची 3 पदे असताना 2 जागा रिक्त आहेत. कार्य (विशेष उपकरणे) पदाच्या तीनही जागा रिक्त आहेत. कार्यदेशक पदाच्या 4 जागा पैकी 3 जागा रिक्त आहेत. सहाय्यक कार्यदेशक पदाच्या 7 पैकी 3 जागा रिक्त आहेत. प्रथम श्रेणी जोडारी पदाच्या 13 जागा असताना 8 जागा रिक्त आहेत. द्वितीय श्रेणी जोडारी पदाच्या 16 पैकी 10 जागा रिक्त आहेत. मोची पदाच्या द्वितीय श्रेणीच्या 3 जागा असताना 1 पद रिक्त आहेत. सुतार पदाच्या द्वितीय श्रेणीच्या 3 जागा असताना 1 पद रिक्त आहेत. रंगारी प्रथम श्रेणीच्या 2 जागाही रिक्त आहेत. लोहार प्रथम श्रेणीची एक जागा असून तीदेखील भरण्यात आलेली नाही. वीजतंत्री द्वितीय श्रेणीच्या 2 जागा असून दोन्ही जागा रिक्त आहेत. बॉडी – बिल्डर कम वेल्डर पदाची एक जागा असून ही जागा ही रिक्त आहे. स्वयंचल विजतंत्री द्वितीय श्रेणीच्या 4 जागांपैकी 1 जागा रिक्त आहे. संधाता द्वितीय श्रेणीच्या 2 जागा पैकी 1 जागा रिक्त आहे. दुकान अभिलेखक पदाच्या 3 पैकी 1 जागा रिक्त आहे. भांडार साहाय्यक पदाच्या 3 जागा ही रिक्त आहेत.
तर ऑईल ग्रीसर आणि टायर प्रेशरमन पदासाठी प्रत्येकी एक – एक पद असताना हे दोन्ही पदे ज्या दिवसांपासून निर्माण झालेले आहे, तेव्हापासून भरलेले नाही.
प्रशासकीय अधिकारी पदाच्या 3 जागा असून 1 जागा रिक्त आहे. मुख्य लिपिक, भांडार पर्यवेक्षक आणि वरीष्ठ लघुलेखक पदाच्या प्रत्येकी 1 जागा रिक्त आहे. कनिष्ठ लघुलेखक पदाच्या 8 जागांपैकी 6 जागा रिक्त आहेत. लिपिक, भांडारपाल व समय लेखक पदाच्या 86 जागांपैकी 33 जागा रिक्त आहेत. टंकलेखक पदाच्या 3 ही जागा रिक्त आहेत. लिपिक नि टंकलेखक पदाच्या 2 जागा असून 2 जागा रिक्त आहेत. रजा राखीव लिपिक पदाच्या 2 जागा असून 1 जागा रिक्त आहे. दूरध्वनी चालक अ श्रेणी ची 1 जागा आणि दूरध्वनी चालक ब श्रेणी ची 4 ही जागा रिक्त आहेत. सफाई कामगार पदाच्या 6 जागा आणि हमाल पदाच्या 39 जागांपैकी 10 जागा रिक्त आहेत.
भायखळा आणि मरोळ वाहन दुरुस्ती कार्यशाळेत मिळून एकूण 33 कामगार (लेबर) आहेत. यामध्ये भायखळा वाहन दुरुस्ती कार्यशाळेत 20 कामगार आणि मरोळ वाहन दुरुस्ती कार्यशाळेत 12 कामगार कार्यरत आहेत. तर दोन्ही कार्यशाळेत मिळून 11 कामगारांची पदे रिक्त आहेत. हे कामगार वाहन दुरुस्तीच्या कामात मदतनीस म्हणून काम करतात.
इतक्या मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ कमी असल्याने आणि रिक्त जागांची भरती न केल्यामुळे सर्रासपणे अग्निशमन दलाच्या वाहनांची दुरुस्ती कंत्रादारांकडून केली जात आहे. विशेष म्हणजे, कंत्राटदार वाहनांची दुरुस्ती ही भायखळा येथील कार्यशाळेत करताना येथील वीज, पाणी आणि हवा या सर्व गोष्टींचा वापर मोफत करत असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.
भरती न केल्यामुळे मनुष्यबळ कमी आणि आहे त्या कर्मचाऱ्यांच्या हाताला काम न देता कंत्रादारांकडून वाहनांची दुरुस्ती केली जात आहे, पण हे थांबणार कधी आणि आमच्या हाताला काम मिळणार कधी, असा सवाल अग्निशमन दलाच्या कामगार – कर्मचाऱ्यांकडून विचारला जात आहे.
Also Read: तांत्रिक ज्ञान नसलेला उपप्रमुख अग्निशमन अधिकारी सांभाळतो वाहनांची जबाबदारी!