चित्रकार व सुलेखनकार श्री. सुभाष जमदाडे आणि चित्रकार श्री. सुरेश गोसावी यांच्या रंगलेपनातील चित्राविष्कार अनुभवण्याची कला रसिकांना संधी
X: @maharasahtracity
मुंबई: चित्रकार व सुलेखनकार सुभाष जमदाडे यांच्या ‘मंत्राक्षरे’ आणि चित्रकार सुरेश गोसावी यांच्या ‘भक्ती आणि शक्ती’ या विषयावरील चित्रकृतींचे एकत्र प्रदर्शन दिनांक २६ डिसेंबर, २०२३ पासून मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी (फोर्ट) येथे सुरु झाले आहे. रंगलेपनातील हा चित्राविष्कार सोमवार, दिनांक १ जानेवारी, २०२४ पर्यंत कलारसिकांना अनुभवता येणार आहे.
सुभाष जमदाडे आणि सुरेश गोसावी यांनी आपल्या कलाशिक्षणाची सुरुवात पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयातून केली. याआधी दोघांचीही अनेक एकल प्रदर्शने पुणे व मुंबई येथे झाली होती. मात्र, मुंबईत अशाप्रकारचे एकत्रित चित्रप्रदर्शन पहिल्यांदाच या दोन्ही ख्यातनाम चित्रकारांनी भरविले आहे. त्याचा कला अनुभव घेण्याची उत्तम संधी यानिमित्ताने रसिकांना लाभली आहे.
सुभाष जमदाडे हे सुलेखनकार म्हणून परिचित आहेत. त्याच बरोबर सुलेखनातून चित्रकृती (पेंटिंग) साकारण्याचे कलाप्रयोग ते सातत्याने करत असतात. या प्रदर्शनात चित्रांच्या माध्यामतून त्यांनी हिंदू संस्कृतीतील ‘अध्यात्म व उपासना मंत्र’ यावर सर्जनात्मक आविष्कारातून विलोभनीय कलाकृती साकारल्या आहेत. ओंकार आणि गायत्री मंत्र यांचा दृश्यानुभव पाहणाऱ्याला मंत्रमुग्ध करून एका उच्च अध्यात्मिक पातळीवर घेऊन जातो. चित्रातील अक्षर-आकारांची कलात्मक रचना, सुलेखनात्मक पार्श्वभूमी, रंगसंगती, रंगलेपनातील पोत, चित्रातील छायाप्रकाश, गतिमानता यामुळे कलाकृती पाहताना मनात ऊर्जात्मक भक्ती स्पंदने निर्माण होतात. विशेषत: ‘ओंकार’ हा एक वैश्विक पवित्र ध्वनी असून, त्याचे अवकाशातील चित्रात्मक ब्रम्हांड स्वरूप पाहताना अदृश्य सकारात्मक ऊर्जेचा अनुभव कलारसिकांना येतो. त्यांच्या अनोख्या शैलीतील श्री गणेशाचे अदभुत अमूर्त रूप पाहताना साक्षात चैतन्याचा अविष्कार वाटतो.
सुरेश गोसावी हे चित्रकलेचे निस्सीम भक्त आहेत. सर्वकाही विसरून भक्तिरसात तल्लीन होत, मनाची शांती या माध्यमातून लाभते अशी त्यांची चित्रकला आहे. या चित्रकलेतून एक नवी उमेद व ऊर्जा मिळते. कलारसिक त्याला शक्ति म्हणून संबोधित करू शकतात. नैराश्यातून एकाग्रतेकडे, सुखाकडून समाधानाकडे जाण्यासाठी भक्ती आणि श्रद्धा आवश्यक असते. मग ती कोणत्याही निराळ्या स्वरूपात असो. सुरेश गोसावी यांच्या ‘भक्ती आणि शक्ती’ या चित्र मालिकेतून याचा प्रत्यय सर्व कलारसिकांना पहायला मिळतो. कुतूहल व निरागसतेचे रूप म्हणजे लहान मुले, भक्तीचे रूप म्हणजे वारकरी आणि शक्तीचे रूप म्हणजे महाकाय हत्ती, श्रद्धास्थानी देवदेवतांची अनोखी रूपे, अशा अनेक प्रतीकात्मक घटकांच्या सहज, सोप्या मांडणीतून आणि प्रभावी रंगलेपनातून गोसावी यांनी केलेला चित्राविष्कार पाहताना मनाला भक्तिमय, सुखद व अंतर्मुख करणारा अनुभव येतो. जहांगीर आर्ट गॅलरी येथे प्रदर्शन स्वरुपात या सर्व कलाकृती कलारसिकांस पाहता येणार आहेत. आवर्जून भेट द्यावी, असे हे चित्रकृती प्रदर्शन आहे.