नवी दिल्ली
प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी IANS इंडिया ही वृत्तसंस्था विकत घेतली आहे. या डीलनंतर मीडियावर अदानी ग्रुपची पकड मजबूत होताना दिसत आहे. याआधी गेल्या वर्षी मार्चमध्ये त्यांनी क्विंटिलियन बिझनेस मीडिया खरेदी केला होता, जो बीक्यू प्राइम नावाचा डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म चालवतो. यानंतर डिसेंबरमध्ये अदानी समूहाने NDTV मधील 65 टक्के भागा खरेदी केला.
किती पैशात करार झाला अद्याप खुलासा नाही
अदानी समूहाने आयएएनएस वृत्तसंस्थेत बहुतांश भाग खरेदी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याची उपकंपनी AMG Media Networks (AMNL) ने IANS India Private Limited मध्ये 50 टक्के हिस्सा खरेदी केला आहे. मात्र, अदानी समूहाने या कराराची किंमत जाहीर केलेली नाही.
अदानी समुहाने गेल्या वर्षी मार्चमध्ये क्विंटिलॉन बिझनेस मीडिया, फायनान्स न्यूज डिजिटल प्लॅटफॉर्म बीक्यू प्राइम चालवणारी कंपनी खरेदी केली होती. यानंतर डिसेंबरमध्ये अदानींनी एनडीटीव्हीतील मोठा भाग खरेदी केला होता. या दोन्ही कंपन्या AMNL ने विकत घेतल्या होत्या. माहिती देताना, AMNL ने सांगितले की त्यांनी IANS आणि संदीप बामझाई सोबत शेअरहोल्डर करार केला आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात IANS चा महसूल 11.86 कोटी रुपये होता.