Twitter : @maharashtracity
मुंबई
पूरक आहाराची रक्कम वाढवणे, मोबाईल देणे, दरमहा पेशन देणे, सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देणे आदि प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी कर्मचारी ४ डिसेंबर पासून बेमुदत संपावर जाणार असल्याचे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृति समितीकडून सांगण्यात आले.
मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याची तक्रार यावेळी कर्मचाऱ्यांनी मांडली. अंगणवाडी कर्मचारी पेमेंट ऑफ ग्रॅच्युईटी अॅक्टनुसार पात्र असतल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. अंगणवाडी कर्मचारी या मानसेवी नसून त्या वैधानिक कर्मचारी असल्याचे ही न्यायालयाने म्हटले आहे. त्यांच्या मानधनाएवढी रक्कम दरमहा पेंशन म्हणून देण्याचे महाराष्ट्र सरकारने वेळोवेळी मान्य केले आहे. मात्र दोन वर्षे झाली तरी त्याची अंमलबजावणी अद्याप झाली नसल्याने कर्मचारी संताप व्यक्त करत आहेत.
तसेच अंगणवाडी केंद्रातील बालकांना पूरक पोषण आहाराकरीता प्रत्येक दिवशी ८ रुपये दिले जातात. यात दोन वेळचा आहार देण्याचा सरकारचा नियम आहे. पूरक पोषण आहाराची ८ रुपये रक्कम २०१७ साली ठरली होती. त्यानंतर महागाई दुपटी-तिपटीने वाढली. मात्र, सरकारने पूरक पोषण आहाराची रक्कम वाढवलेली नाही. आहाराची रक्कम वाढवावी अशी मागणी करण्यात येत आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मोबाईल देण्याचे आदेश दिले असताना देखील मोबईल देण्यात आले नाहीत. या कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, मानधनाएवढी पेन्शन द्या, पूरक आहाराची रक्कम वाढवा, मोबईल द्या आदी मागण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी ४ डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारणार असल्याचे सांगण्यात आले.