Twitter : @NalavadeAnant

मुंबई

प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील (Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana) पहिल्या हप्त्यापोटी १७२० कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णयही आज निर्गमित झाल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

२०२३ – २४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ ही योजना उपमुख्यमंत्री व तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यासंदर्भात घोषणा केली होती. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी रुपये ६००० या अनुदानामध्ये राज्य शासनाच्या आणखी ६००० रुपये इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्माननिधी ही योजना राबवण्यास जून २०२३ मध्ये मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार या योजनेअंतर्गत एप्रिल ते जुलै २०२३ या कालावधीच्या पहिल्या हप्त्यापोटी १७२० कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास आज मान्यता देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

निधीचे वितरण पीएफएमएस प्रणालीतून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केले जाणार आहे. पीएम किसान योजनेप्रमाणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मॉड्युल महाडीबीटी पोर्टलवर (Maha DBT Portal) विकसित करण्याचे काम महाआयटीकडून गतीने सुरू असून तांत्रिक कार्यवाहीही लवकरात लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत, असेही शेवटी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here