Twitter : @maharashtracity
कल्याण
तब्बल चार वर्ष तांत्रिक अडचणीमुळे शासनाच्या तिजोरीत गोठलेला २ कोटीचा विशेष निधी राज्य शासनाकडे यशस्वी पाठपुराव्यामुळे पुनर्जीवित करण्यात माजी आमदार नरेंद्र पवार यांना यश आले आहे. या विशेष निधीमुळे कल्याण – डोंबिवली महापालिका क्षेत्रातील आठ रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीरणाचे काम करण्याचा शासन निर्णय राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने दिनांक ४ ऑगस्ट २०२३ रोजी काढला आहे. यामुळे माजी आमदार पवार नरेंद्र पवार यांनी मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार व्यक्त केले आहे.
कल्याण – डोंबिवली महापालिका अंतर्गत असणाऱ्या कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रासाठी रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण, नूतन उद्याने विकसित करणे, तलावांचे व वाहतूक बेट सुशोभीकरण आदी विकास कामांसाठी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आपल्या कार्यकाळात तब्बल २० कोटीहून अधिक विशेष विकासनिधी मंजूर करून ही विकासकामे पूर्ण केली. याचवेळी कल्याण – डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३७ जोशीबाग या प्रभागातील कॅनरा बँक मोहमद्द आली चौक ते संतोषी माता रोड या अंतर्गत रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरणासाठी २ कोटी निधीला शासन मंजुरी मिळाली होती. मात्र, काही तांत्रिक अडचणीमुळे विकासकाम मार्गी लागले नाही, यामुळे हा निधी शासनाच्या तिजोरीतच पडून होता.
दरम्यान, त्यानंतर आमदार नरेंद्र पवार यांचा कार्यकाळ संपल्यानंतर हा निधी दुसऱ्या विकासकामांसाठी पुनर्जीवित करण्याचे पवार यांनी निश्चित करुन तसा पाठपुरावा त्यांनी राज्याच्या नगरविकास विभागाकडे सुरु केला. या कामाला त्यांना यश आले असून, या २ कोटी विशेष निधीच्या विकासकामाचा शासन निर्णय राज्याच्या नगरविकास विभागाने नुकताच काढला आहे. यामुळे महापालिका क्षेत्रातील पारनाका प्रभागातील तब्बल ८ रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम होणार असल्याने येथील नागरिकांना सुविधा प्राप्त होणार आहे. शासनाच्या या निर्णयाचे माजी आमदार पवार यांनी राज्य सरकारचे आभार व्यक्त केले आहे.