Twitter: @Rav2Sachin
मुंबई: ना आम्ही नेपाळी आहोत ना आम्ही चिनी देशाचे नागरिक, आम्ही भारतीय आहोत, हेच आम्हाला लोकांना सांगण्याचा प्रयत्न आमच्या नाटकातून करत आहोत, असे अरुणाचल रंग महोत्सवाचे प्रमुख आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे सहाय्यक प्राध्यापक रिकेन नगोमले यांनी maharashtra.city शी बोलताना सांगितले.
अरुणाचल रंग महोत्सव दिल्ली, मुंबई, कोलकता आणि गुवाहटी येथे होत आहे. महोत्सवाची सुरुवात दिल्ली येथे झाली. दिल्ली येथील महोत्सव १८ जुलै ते २१ जुलै होता आणि आता मुंबईत अरुणाचल रंग महोत्सव २५ जुलै ते २८ जुलै सुरु असून आज दादर शिवाजी पार्क येथील वीर सावरकर सभागृहात महोत्सवाचा शेवटचा दिवस आहे.
भारत देशाचा पहिला सूर्योदय होणारा प्रदेश अशी ओळख असलेला अरुणाचल प्रदेश हा डोंगर, दऱ्या, नदी आणि पुरातन वास्तूंनी नटलेला प्रदेश असल्याने येथील सौंदर्य बघण्यासाठी पर्यटकांची रेलचेल असते. येथील संस्कृती आणि कला आजही अरुणाचल प्रदेशाचे लोक जपत आहे. हेच अरुणाचल रंग महोत्सवातून दाखविण्याचा प्रयत्न नाटकाच्या प्रयोगाद्वारे केला जात आहे. महोत्सव दिल्ली, मुंबई, कोलकता आणि गुवाहटी चार राज्यात होणार आहे. महोत्सवात १२५ कलाकार सहभागी झालेले आहेत.
आम्ही अरुणाचल प्रदेशाची संस्कृती दाखविण्याचा प्रयत्न नाटकाद्वारे करताना येथील इतिहासही आम्ही लोकांसमोर मांडत आहोत. विशेष म्हणजे, १९७२ मध्ये अरुणाचल प्रदेश असे नामकरण करून भारत देशाचे केंद्रशासित राज्य म्हणून घोषित केले गेले. पण असे असतानाही आज ही आम्हाला आमच्या रंगरुपाने नेपाळी किंवा चिनी नागरिक म्हणून ओळखले जात आहे, याची आम्हाला खंत वाटते. आम्ही अरुणाचल प्रदेशमध्ये राहतो. आम्ही भारतवासी आहोत. हेच आम्ही नाटकाद्वारे सांगण्याचा प्रयत्न करत आहोत, असे प्राध्यापक नगोमले यांनी सांगितले.
मुंबईनंतर महोत्सव कोलकता येथे २ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट आणि त्यानंतर महोत्सवाचा समारोप गुवाहटी येथे होणार आहे. येथे ८ ऑगस्ट ते ११ ऑगस्टपर्यंत अरुणाचल रंग महोत्सव असणार आहे, असे प्राध्यापक नगोमले यांनी सांगितले.