Twitter : @maharashtracity
मुंबई
राज्यात सातत्याने बदलत असलेल्या राजकीय समीकरणामुळे विधिमंडळाच्या समित्या नियुक्त करण्यात अडचणी येत असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज स्पष्ट केले.
काँग्रेस सदस्य नाना पटोले यांनी यासंदर्भात औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता. पटोले यांनी विधिमंडळ समित्या नियुक्त झाल्या नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. ते म्हणाले, २०१९ मध्ये नवीन विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर विधिमंडळ समित्या नियुक्त करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतर आलेल्या कोविडमुळे समितीच्या बैठका झाल्या नाहीत. कोविडनंतर काहीकाळ कामकाज सुरू झाले होते. मात्र, आता (सरकार बदलल्यामुळे) अजूनही समिती नियुक्ती झालेल्या नाहीत.
नाना पटोले म्हणाले, या सभागृहात अनेक नवीन सदस्य निवडून आले आहेत. विधिमंडळाचे कामकाज केवळ अधिवेशन कालावधीपुरते नसते तर कायम सुरू असते. या माध्यमातून नवीन सदस्यांना कामकाज शिकायला मिळते, ऑडिट पॅरा म्हणजे काय हे त्यांना कसे कळणार? असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला.
पुढील सहा – सात महिन्यांनी पुन्हा निवडणूका लागतील, याकडे लक्ष वेधून या समित्या लवकरात लवकर जाहीर केल्या जाव्यात अशी मागणी नाना पटोले यांनी केली.
यावर उत्तर देताना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले की त्यांच्याकडे समितीसाठी येणारी नावे अनेक वेळा बदलण्यात आली. “मी समिती नियुक्ती करतो आणि लगेच त्यात बदल करावा लागतो. नाना पटोले जी, तुम्हाला माहित आहे की राज्यात राजकीय समीकरण कसे वारंवार बदलत आहे.” अध्यक्ष नार्वेकर यांनी सभागृहाला आश्वासन दिले की हे अधिवेशन संपल्यानंतर लवकरात लवकर विधिमंडळ समित्या नियुक्त्या केल्या जातील.