Twitter : @NalavadeAnant

मुंबई

विधानभवन परिसरात मणिपूरमधील परिस्थितीवर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मणिपूरमधील परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून या परिस्थितीला मणिपूरचे भाजपा सरकार व केंद्रातील मोदी सरकारच जबाबदार आहे.

नाना पटोले म्हणाले, मणिपूरमधील भाजपा आमदारानेच मुख्यमंत्री व केंद्रीय गृहमंत्र्यावर गंभीर आरोप केले आहेत. सरकारच एका जातीवर अत्याचार करण्यास प्रोत्साहन देत आहे आणि कारवाई मात्र केली जात नाही. महिलेला विवस्त्र करून तिची धिंड काढून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याच्या आणखी चार घटना घडल्याचे या स्थानिक आमदारानेच जाहीरपणे सांगितले आहे. या घटनांची माहिती मणिपूरचे मुख्यमंत्री व केंद्रीय गृहमंत्र्यांना दिली. पण त्यासंदर्भात कारवाई काही झाली नाही, असा गंभीर आरोप त्या आमदाराने केल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

मणिपूरमधील ज्या महिलेवर अत्याचार करण्यात आला तिचा पती कारगिल युद्धाचा हिरो आहे. देशाला वाचवण्यासाठी जिवाची पर्वा न करता त्याने विजय मिळवला, भारतमातेला त्याने वाचवले. पण स्वतःच्या पत्नीची इज्जत मात्र तो वाचवू शकला नाही. मणिपूर जळत आहे पण मोदी सरकार व भाजपाला त्याचे काही देणेघेणे नाही. देशात व राज्यात लोकशाहीला काळिमा फासण्याचे काम भाजपा करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

आषाढी वारीच्यावेळी आळंदीत झालेल्या वारकऱ्यांवरील लाठीहल्ला प्रकरणी अधिवेशनाचे कामकाज सुरु होण्याआधी विरोधीपक्षांनी विधान भवनाच्या पायऱ्यावर आंदोलन केले. वारकऱ्यांवर लाठीहल्ला करणाऱ्या सरकारच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here