मंदगती कामामुळे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन संतापले
Twitter : @maharashtracity
मुंबई
राज्य सरकारचे मुंबईतील जेजे रुग्णालयाच्या सुपरस्पेशालिटी इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्याची मुदत उलटून गेली तरीही सुपरस्पेशालिटी उभारण्याचे काम सुरु आहे. यावरुन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांना सवाल केला असता, कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करुन अन्य ठेकेदाराला काम देण्यात येईल असे महाजन यांनी स्पष्ट केले. दीर्घकाळ लांबलेल्या कामामुळे नाराज झालेले मंत्री गिरीश महाजन यांनी जे जे सुपरस्पेशालिटी कामाचा कंत्राटदार बदलण्यात येणार असल्याचे सांगितले. बुधवारी राज्य सरकारच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात डायलेसिस सेवेच्या उद्घाटनासाठी आलेल्या महाजन यांनी उपरोक्त विधान केले.
दरम्यान, २० जुलै रोजी जे जे रुग्णालय सुपरस्पेशालिटी बांधकाम पूर्ण होण्याचा कालावधी संपणार आहे. येथील बांधकाम ३० टक्के ही पूर्ण झाले नाही. नेमका हाच प्रश्न वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांना विचारण्यात आला. त्यावेळी महाजन यांनी कंत्राटदाराच्या मंदगती कामावर नाराजी व्यक्त केली. या जुलै महिन्यात हे काम पूर्ण होणार होते. मात्र अद्याप ते काम अर्ध्यावरही आले नसल्याचे महाजन म्हणाले. त्याची कामाची गती पाहता कंत्राटदारावर सर्व प्रकारच्या नोटिसा बजावून झाल्या आहेत. तो कंत्राटदार हव्या त्या गतीने काम करत नाही ही वस्तुस्थिती असल्याची कबुली महाजन यांनी दिली. त्यामुळे कंत्राटदारावर तात्काळ कारवाई करणार असल्याचे महाजन म्हणाले. या तात्काळ कारवाईत वेळ आलीच तर त्याचे कंत्राटच रद्द करण्यात येईल, नव्या ठेकेदाराला ते काम देण्यात येईल. त्याच बरोबर ठेकेदारविरोधात दंडात्मक कारवाई सुरु आहे. तरीदेखील त्याच्या कामाला गती नाही, हेच मुळात दुर्दैव असल्याचे महाजन यांनी सांगितले.