By Santosh More
Twitter : @MoreSantosh
मुंबई: राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष सहभागी झाल्यामुळे राज्यात तीन इंजिनचे सरकार सत्तेवर आले आहे. राष्ट्रवादीच्या एकूण नऊ सदस्यांनी काल रविवारी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र खाते वाटप अजूनही झालेले नाही. मंत्रिमंडळात शिवसेना आणि भाजपच्या वाट्याला आलेल्या आणि सध्या रिक्त असलेल्या जागा राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाआधीच भरल्या जाणार असून त्यानंतरच खाते वाटप केले जाईल, अशी माहिती शिंदे गटाकडून देण्यात आली.
राज्य मंत्रिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वगळता या दोन्ही पक्षांचे प्रत्येकी 9 सदस्य मंत्रीपदावर आहेत. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या एकूण नऊ सदस्यांनी रविवारी 2 जुलै रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या आता 29 झाली आहे. महाराष्ट्रात एकूण 42 पर्यंत मंत्र्यांची संख्या वाढवता येते, त्यामुळे अद्यापि 13 जागा रिक्त आहेत.
अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आजच खाते वाटप होईल, अशी आशा होती. मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे. त्यामुळे खातं वाटप आजच होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र शिंदे गटातील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार अधिवेशनाधी अजून एक छोटा मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे. या विस्तारात शिवसेना आणि भाजपमधील काही सदस्यांना मंत्रिपदाची शपथ दिली जाईल आणि त्यानंतरच खातेवाटप केली जाईल. या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन-चार दिवसांमध्येच हा छोटा विस्तार केला जाणार आहे.
दरम्यान, मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत राष्ट्रवादीचे बिनखात्याचे मंत्री सहभागी होतील. हे नवीन नाही, यापूर्वीही काही काळसाठी बिनखात्याचे मंत्री राज्याला लाभले होते, अशी पुष्टी एका अधिकाऱ्याने दिली.
या मंत्र्यांना वगळणार ?
मंत्रिमंडळ विस्तार करताना भारतीय जनता पक्ष काही मंत्र्याना वागळणार असल्याचा दावा भाजपमधील एका नेत्याने केला. यात अतुल सावे, मंगलप्रभात लोढा, डॉ विजयकुमार गावीत यांचा समावेश असल्याचे समजते.