Twitter : @maharashtracity

मुंबई: अर्धवटराव हे पात्र रामदास पाध्ये यांच्या बोलका बाहुल्यातील आहे. मात्र पाध्येंची दोन पात्रं असून त्यात अर्धवटराव आणि आवडाबाई मोडतात. या दोन्ही पात्रात आता फडणवीस मोडताना दिसत नाही. आता ते नावडाबाई झाले असल्याची खोचक टिका उद्धव ठाकरे यांनी केली. सोमवारी शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. तेव्हापासून दोन्ही बाजूंनी तुफान टिका सुरु असून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव यांचा उल्लेख अर्धवटराव असा केला होता. त्यावर उद्धव ठाकरे यांनी आज पलटवार करुन फडणवीसांवर खरपूस टिका केली. आता ते (फडणवीस) मला अर्धवटराव म्हणत असतील, मात्र ते दिल्लीश्वरांचे आवडाबाई तरी आहेत का? असा सवालही ठाकरे यांनी शिवसेना भवनात मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

उद्धव ठाकरे यांनी सोमवारी वर्धापन दिनी क्लिप ऐकवली होती. यात देवेंद्र फडणवीस यांनी कोविड लसीसंदर्भात विधान करताना उद्धव ठाकरेंना अर्धवटराव अशी उपमा देत टीका केली होती. मात्र देवेंद्र फडणवीस असं काही बोलू शकतात, यावर आपला विश्वास बसत नसल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली. ती क्लिप कुणी मॉर्फ्ड केली होती का? हे त्यांनी शोधावे. ते या क्लिपमध्ये म्हणतात की ‘मोदींनी लस तयार केली नसती तर?’ मोदींनी लस तयार केली? मला वाटत नाही की मोदी असं बोलले असतील. त्यावर ते मला अर्धवटराव म्हणाले असल्याचे ठाकरे म्हणाले. मोदींनी लस तयार केली या वाक्याला काही अर्थ आहे का? म्हणे पूर्ण क्लिप ऐकवली नाही, पण ते वाक्य तर आहे ना? ते नसते तर आपण कटोरा घेऊन बसलो असतो वगैरे.. कोणत्या जगात तुम्ही आहात? लोकांना मूर्ख का समजता? असा सवाल उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना केला. मात्र आपण मुख्यमंत्री असताना एकरकमी चेक देऊन लस खरेदी करण्याची तयारी दाखवली होती. मात्र लसी दिल्या नाहीत. तरीही कधी केंद्राला दोष न देता कोविड सेवा सुरु ठेवली. केंद्रानं पीपीई किट कुठून आणले? त्याची खरेदी कशी झाली? त्यात घोटाळा झाला का? रेमडेसिवीर कुठून आणली? टेंडर काढले होते का? असे कधी विचारले नसल्याचेही ठाकरे यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here