By Anant Nalavade
Twitter : @nalavadeanant
मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी स्थापन झालेल्या शिवसेना पक्षाचा ५७ वा वर्धापनदिन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्वत्र उत्साहात साजरा केला जात असून शिवसेनेच्या याच वर्धापन दिनाच्या मुहूर्तावर पक्षाचे “शिवसेना” (shivsenaofc) हे अधिकृत फेसबुक पेज, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटचा शुभारंभ करण्यात येत आहे. शुभारंभ करण्यात आलेल्या या समाजमाध्यमांच्या अकाउंटवरून यापुढे पक्षाचे निर्णय, पक्षातर्फे राबविण्यात येणारे विविध उपक्रम,अभियान यांची माहिती वेळोवेळी प्रसारित करण्यात येईल. तसेच शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिकाही यावरून प्रसारित करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील मराठी जनतेला न्याय मिळावा, त्यांच्या समस्या, त्यांचे प्रश्न मार्गी लागावे. त्यांच्यासाठी लढणारी एक हक्काची कणखर अशी संघटना असावी यासाठी प्रबोधनकार ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली. या संघटनेला घरोघरी पोहचवण्याचे काम शिवसैनिकांनी केले.या सर्व शिवसैनिकांनी वेळोवेळी हिंदुत्वाच्या विचारांचे बाळकडू देण्याचे काम बाळासाहेबांनी आणि आनंद दिघे यांनी केले. यामुळे दिवसेंदिवस शिवसेना अधिक प्रखर आणि मराठी माणसाच्या हक्कांसाठी झगडणारी संघटना म्हणून देशभर ओळखली जाऊ लागली.
बाळासाहेबांच्या आणि आनंद दिघे यांच्या विचारांचा आणि कार्याचा हाच वारसा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहेत. वेगवान पद्धतीने विकासकामे मार्गी लावण्याच्या एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीमुळे राज्यातील नागरिकांचा शिवसेनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. शिवसेनेच्या याच कार्याची, विकासकामांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचावी यासाठी पक्षाचे अधिकृत फेसबुक पेज, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटचा शुभारंभ करण्यात येत आहे. बदलत्या काळानुसार समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करणे महत्वाचे ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर समाज माध्यमांवर शिवसेनेचे हे अधिकृत पेज सुरु करण्यात येत आहे. यावरून यापुढे पक्षाचे निर्णय, पक्षातर्फे राबविण्यात येणारे विविध उपक्रम, अभियान यांची माहिती वेळोवेळी प्रसारित करण्यात येईल. तसेच शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका यावरून जाहीर करण्यात येईल. यामुळे शिवसेनेचे काम अधिक व्यापक स्वरूपाने राज्यातील नागरिकांपर्यंत पोहचण्यास मदत होणार आहे. याच बरोबर सर्व शिवसैनिकांशी याद्वारे थेट संवाद साधणे सोपे होणार आहे. यामुळे अधिकाधिक नागरिकांनी पक्षाच्या या उपक्रमाला पाठिंबा दर्शविण्याचे आवाहन पक्षाकडून करण्यात आले आहे.