शिक्षणतज्ज्ञ डॉ.अलका नाईक यांचे प्रतिपादन
शिवगौरवगान २६ वाहिन्यांवर प्रसारित होणार
By Yogesh Trivedi
Twitter : @maharashtracity
मुंबई: ३५० व्या शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्यानिमित्ताने मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मॉरिशस येथे आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक व मराठी साहित्य संमेलनात कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानी असलेल्या भारतातील प्रथितयश शिक्षणतज्ज्ञ डॉ. अलका नाईक यांनी सांगितले की, साहित्याने मने जोडली जातात, माणसे जोडली जातात आणि देशही जोडले जातात.
शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्यानिमित्त हा कार्यक्रम मॉरिशस येथे आयोजित करण्यात आला होता. याअंतर्गत ‘शिवगौरवगान’ ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित जोशपूर्ण गीतांच्या बहारदार कार्यक्रमाचे मॉरिशस ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनमध्ये चित्रीकरण करण्यात आले. ते विविध देशांमध्ये 26 वाहिन्यांवर प्रसारित करण्यात येणार आहे.
सुप्रसिद्ध प्रवचनकार सौ अलका मुतालिक यांनी शिवराय आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या गुरु- शिष्याच्या नात्यावर तसेच शिवाजी महाराजांचे गनिमी कावे यावर अतिशय सुंदर निरूपण केले. शिवरायांची आरती, ओव्या, स्तोत्र, स्फूर्ती गीत, जिजाऊ आणि शिवबा यांच्या कर्तृत्वावर आधारित स्वरचित पोवाडे आणि महाराष्ट्राचे समूहगीत अशा स्फूर्तीदायक विविध रचना या कार्यक्रमात सादर करण्यात आल्या.
डॉ.अलका नाईक, सुलभा चव्हाण, नेत्रा फडके, श्रेया बापट, नरेंद्र बापट, कु. देवाशिष पाठक व अक्षय चव्हाण या सर्व कलाकारांनी अनेकविध गीते सादर केली. तसेच कु.अथर्व बापट याने अतिशय सुरेल असे कीबोर्ड वादन सादर केले. या कार्यक्रमात मुकुंद जोशी, सौ. ममता जोशी, मधुकर पाठक, लता पाठक, रजनी चौधरी, स्वाती कुकडे, आदिती मोरये, पुष्पलता तळेकर, रेखा पागधरे, कमल घरत, कु. नीती याज्ञिक या सर्व कलाकारांनी कोरसची साथ दिली. सहभागी कलाकारांना मॉरिशस ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनचे चीफ प्रोड्युसर अर्जुन पुतलाजी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
त्यानंतर डॉ.अलका नाईक, को. प्र. उपाध्यक्षा-मराठी साहित्य परिषद, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी कविसंमेलनाचा कार्यक्रम पार पडला. यामधे नेत्रा फडके, सुलभा चव्हाण व डॉ.अलका नाईक यांनी स्वरचित कविता सादर केल्या. कमल घरत यांनी त्यांची कन्या शुभम् पाटील यांनी लिहिलेली कविता सादर केली. तसेच अक्षय चव्हाण यांनी उस्फूर्तपणे मिमिक्री सादर करून उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या. समाजसेविका रेखा पागधरे यांनी उत्कृष्ट समालोचन केले तर कवयित्री प्रियदर्शनी नाबर यांनी शिवबांवर रचलेली कविता आदिती मोरये यांनी सादर केली आणि पुष्पलता तळेकर यांनी कोकणी गाण्यांवर ताल धरला.
सर्वांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत प्रत्येकानेच म्हणजेच २१ कलाकारांनी विविध रूपात आपली कला सादर केली. या प्रसंगी कवी संमेलनाध्यक्षा कवयित्री डॉ.अलका नाईक यांनी जीवनातील साहित्याचे स्थान व भारत आणि मॉरिशस या देशांची मैत्री या दृष्टीने या संमेलनाचे महत्त्व विशद केले. यावेळी त्यांनी शिवरायांच्या चरित्रावर आधारित पुस्तक, स्वरचित कवितांचा कवितासंग्रह रानगंध तसेच अंकुरले काव्य हा संपादित केलेला बालकवींचा कवितासंग्रह आणि कवयित्री सुलभा चव्हाण यांनी आपला मनोमनी हा कवितासंग्रह सर्वांना भेट दिला. उद्घाटक अलकाताई मुतालिक यांच्या हस्ते सर्वांना प्रशस्तीपत्रके देऊन सन्मानित करण्यात आले. दिलीप ठाणेकर, मॅनेजिंग डायरेक्टर- क्रॉसवेज इंटरनॅशनल यांनी परिश्रमपूर्वक या सर्व कार्यक्रमांचे आयोजन केले त्याबद्दल सर्वांनी त्यांचे आभार मानले.
या कार्यक्रमासाठी मॉरिशस मधून मराठी भाषिक संघाचे अध्यक्ष नितीन बापू, मॉरिशस मराठी साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष होमराजेन गौरीया, मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशनचे अध्यक्ष असंत गोविंद या अतिथींचे आणि भारतातून अ.भा.म. सा.प. पुणेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांचे शुभाशीर्वाद लाभले. त्याबद्दल आभार प्रदर्शनांतर्गत दिलीप ठाणेकर यांनी या सर्वांचेच आभार मानून भारतातून आलेल्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
शेवटी सर्वांनी जय शिवराय, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र अशा घोषणा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.