By Anant Nalavade
Twitter : @nalavadeanant
मुंबई: गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण अवघ्या एका मिनिटात फुल्ल होत आहे. रेल्वे अधिकारी आणि तिकिटांच्या दलालांच्यातल्या अभद्र युतीमुळेच हे होत असावे. सर्वसामान्य प्रवासी सण-उत्सवाला गावी जात असतात त्यावेळीच दलालांकडून मोठ्या संख्येने रेल्वेच्या तिकिटांचे आरक्षण करुन चढ्या दराने त्याची विक्री करण्याचे रॅकेट सुरु आहे. यामध्ये कोणा-कोणाचे हितसंबध गुंतले आहेत, या गैरप्रकारात कोण-कोण सामील आहे, याची सखोल चौकशी होणे आवश्यक असून या तिकीटाच्या आरक्षणांची मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वने चौकशी करावी. अशा रेल्वे दलालांवर नियंत्रण ठेवावे. तसेच कोकणच्या चाकरमान्यांच्या सोईसाठी गणेशोत्सव काळात अतिरिक्त रेल्वे गाड्या कोकणात सोडण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बुधवारी एका पत्राव्दारे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना केली.
गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा आणि विशेषत: कोकणवासीयांच्या अस्मितेचा, श्रध्देचा, जिव्हाळ्याचा आणि संस्कृतीचा विषय आहे. गणेशोत्सवाची वाट प्रत्येक मराठी माणूस आणि विशेषत: कोकणवासीय वर्षभर बघत असतो. कामानिमित्त जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असला, कितीही अडचणी असल्या तरी कोकणवासीय चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या गावी जातोच. त्याची तयारी व नियोजन प्रत्येक कोकणवासीय चाकरमानी अगदी वर्षभरापासून करत असतो. गणेशोत्सव हा कोकणाचा मोलाचा ठेवा व सांस्कृतिक संचित आहे असेही पवार यांनी पत्रात म्हटले आहे.
कोकण रेल्वे ही कोकणवासीयांची जीवनवाहिनी आहे. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना आतापासूनच प्रतिक्षा यादींचे फलक लागले आहेत. मुंबईच्या छत्रपती टर्मिनसवरुन १५ सप्टेंबरला सुटणाऱ्या कोकणकन्या एक्सप्रेसची प्रतिक्षा यादी अवघ्या दीड मिनिटात हजार पार गेल्याची बाब समोर आली आहे. तर १६ सप्टेंबरचे आरक्षण करण्यासाठी गेलेल्या प्रवाशांना सर्वच गाड्यांसमोर ‘रिग्रेट’ हा मेसेज येत आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या आरक्षणात गैरप्रकार होत असावे, अशी शंका घेण्यास वाव आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे असेही पवार यांनी पत्रात नमूद केले आहे.
गणेशोत्सवासाठी रेल्वे तिकीटाची अवैध प्रकारे विक्री करणारे दलाल मोठ्या संख्येने तिकीटांचे आरक्षण करुन ते चढ्या दराने विक्री करत असल्याचा आजपर्यंतचा अनेकांचा अनुभव आहे. सर्वसामान्य प्रवासी सण-उत्सवाला गावी जात असतात. त्यावेळीच दलालांकडून मोठ्या संख्येने आरक्षण करुन चढ्या दराने विक्री करण्याचे रॅकेट सुरु आहे. यामध्ये कोणा-कोणाचे हितसंबध गुंतले आहेत, या गैरप्रकारात कोण-कोण सामील आहे, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. त्यामुळे या तिकीटाच्या आरक्षणांची मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वने चौकशी करावी. अशा रेल्वे दलालांवर नियंत्रण ठेवावे. तसेच कोकणच्या चाकरमान्यांच्या सोईसाठी गणेशोत्सव काळात अतिरिक्त रेल्वे गाड्या कोकणात सोडण्यात याव्यात, अशी मागणीही पवार यांनी पत्रात केली आहे.