Twitter : @maharashtracity
मुंबई: सांताक्रूझ पूर्व-पश्चिम वाहतुकीसाठी दुवा असणाऱ्या मिलन भूयारी मार्ग अर्थात मिलन सबवेच्या सखल ठिकाणी जोरदार पावसाचे पाणी साचण्यापासून दिलासा देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाकडून भूमिगत पाणी साठवण टाकी बांधली आहे. सुमारे ३ कोटी लीटर क्षमतेच्या या टाकीचा पूर्ण क्षमतेने उपयोग व्हावा म्हणून याठिकाणी अतिरिक्त उपाययोजना करण्यात येत आहेत. ही टाकी संपूर्ण भरण्यासाठी २ पंप व सोबत एक जलवाहिनी तर टाकीतील पाण्याचा उपसा करण्यासाठी अतिरिक्त एक पंप अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे तब्बल सहा तासांपर्यंतचा पाणीसाठा या भूमिगत टाकीमध्ये करून नागरिकांना दिलासा देणे शक्य होणार आहे.
मुंबईत जोरदार पावसाप्रसंगी सखल भागांच्या ठिकाणी पाणी साचते. त्यावर तोडगा म्हणून अशा भागांमध्ये विविध प्रकल्प हाती घेऊन नागरिकांना दिलासा देण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार कामे हाती घेण्यात आली आहेत. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनानुसार वेगवेगळ्या परिसरांमध्ये पाणी साठवण करणाऱ्या टाक्यांच्या ठिकाणी क्षमतावाढीसाठी उपाययोजना केल्या जात आहेत. त्यापैकी मिलन सबवे भूमिगत पाणी साठवण टाकी हा देखील एक प्रकल्प आहे.
मिलन सबवे हा एच पूर्व आणि के पूर्व विभागांचा सीमेचा भाग आहे. मिलन सबवे हा अत्यंत सखल भाग असल्याने याठिकाणी दरवर्षी जोरदार पावसा प्रसंगी पाणी साचून नागरिकांची गैरसोय होत होती. मात्र महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाने ही समस्या लक्षात घेऊन याठिकाणी भूमिगत पाणी साठवण टाकीची उभारणी केली आहे. सुमारे ३ कोटी लीटर क्षमतेच्या या टाकीमध्ये सहा तासांपर्यंत पाणी साठवण्याची क्षमता आहे. सध्या गुरूत्वाकर्षणाने याठिकाणी ८५ टक्के पाणी साठवणे शक्य होत होते. अतिरिक्त १५ टक्के क्षमता उपयोगात येण्यासाठी याठिकाणी पर्जन्य जलवाहिन्या विभागाने ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी आणि दोन पाणी उपसा करणारे ३००० क्युबिक मीटर क्षमतेचे पंप लावण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच टाकीतील पाणी लवकरात लवकर उपसण्यासाठी अतिरिक्त एका पंपाची व्यवस्था केली जाणार आहे. यामुळे भूमिगत टाकीची क्षमतावाढ करणे शक्य होईल. साधारणपणे सहा तासांपर्यंत पाणी साठवणूक क्षमता या अतिरिक्त कामामुळे शक्य होईल, अशी माहिती उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांनी दिली आहे.
मिलन सबवे पाणी साठवणूक टाकीचे दोन पंप सबवेच्या ठिकाणी पाणी उपसा करून टाकी पूर्ण क्षमतेने भरेल, अशा नियोजनाने लावण्यात येईल. तर समुद्राला ओहोटी असताना, टाकीतील पाण्याचा उपसा करता यावा यासाठी अतिरिक्त एक पंप बसविण्यात येणार आहे. हे उपसा केलेले पाणी इर्ला नाला येथे सोडण्यात येईल. या संपूर्ण व्यवस्थेमुळे जोरदार पावसाप्रसंगी सखल भागामध्ये पाणी साचण्यापासून दिलासा मिळतानाच दुसरीकडे टाकीतील पाण्याचा उपसा करण्यासाठी पंपांचा वापर होईल, असे प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) विभास आचरेकर यांनी सांगितले.