जवाब नोंदवून घेण्यास वेळ लागला
By Santosh More
Twitter: @moresantosh
मुंबई: सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सुमारे नऊ तासाहून अधिक काळ सुरू असलेली चौकशी रात्री साडे नऊ वाजता संपली. ई डी च्या अधिकाऱ्यांनी आपल्याला चांगले सहकार्य केले आणि मी देखील त्यांना सहकार्य केले, अशा शब्दात जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस भवनात पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
आय एल् अँड एफ एस या बंद पडलेल्या आणि आर्थिक गैरव्यवहार केलेल्या कंपनीशी जयंत पाटील यांचे हितसबंध असल्याच्या संशयावरून जयंत पाटील यांना ई डी कडून समन्स बजावण्यात आले होते. पाटील यांनी काही दिवसांची मुदत मागवून घेतली होती आणि आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास ते ई डी च्या कार्यालयात दाखल झाले. तत्पूर्वी पाटील यांनी पक्ष कार्यालयात हजेरी लावून पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आपण चुकीचे काम करत नाही आणि कुठलेही चुकीचे काम केलेले नाही, असा विश्वास जयंत पाटील यांनी सकाळी व्यक्त केला होता.
तब्बल साडे नऊ तास झालेल्या चौकशीनंतर पाटील यांनी रात्री पुन्हा पक्ष कार्यालयात जाऊन दिवसभर त्यांची वाट बघत असलेल्या कार्यकर्त्यांची संवाद साधला. ई डी च्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना मी उत्तर दिले असून अधिकाऱ्यांनीही मला चांगलं सहकार्य केले असे पाटील यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. माझा जवाब नोंदवून घ्यायला वेळ लागल्याने आपल्याला बाहेर यायला उशीर झाला, असे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यातील नंदुरबार, चंद्रपूरपासून ठाणे, औरंगाबादपर्यंत अनेक ठिकाणाहून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जयंत पाटील यांना समर्थन देण्यासाठी पक्षाच्या मुंबई येथील कार्यालयासमोर सकाळपासून ठाण मांडून होते. त्यांचे जयंत पाटील यांनी आभार मानले. राज्यभर काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या नेत्यांनी जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ ईडी चा निषेध नोंदवला. त्याचाही उल्लेख पाटील यांनी त्यांच्या आभार प्रदर्शनात केला. आता आपल्याला आणखीन जोरात काम करायचा आहे, असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये जागवला.