By Anant Nalawade

Twitter: @nalavadeanant

मुंबई: महाराष्ट्राची लोककला, लोकसंस्कृती असलेल्या तमाशा कलेला लोकमान्यता, राजमान्यता मिळवून देणाऱ्या लोक कलावंतांना वृद्धापकाळात सन्मानाने चांगले जीवन जगता यावे, त्यांच्या निवास, भोजन, औषधोपचाराची सोय व्हावी, म्हणून वृध्दाश्रम असावेत, त्यांना अल्पव्याजाने कर्ज मिळावे, मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी, शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी तमाशा सम्राज्ञी स्व. विठाबाई नारायणगावकर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शनिवारी एका निवेदनाद्वारे राज्य शासनाकडे केली.

अजित पवार यांनी विधीमंडळ अधिवेशनातील चर्चेवेळी सरकारकडे तमाशासह सर्व लोक कलावंतांसाठी महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली होती. परंतु सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्याने पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आज पत्र लिहून या मागणीचा पुनरुच्चार केला. 

तमाशा ही महाराष्ट्राची लोककला, लोकसंस्कृती आहे. राज्यातील मागास, अतिमागास समाजातील कलावंतांच्या पिढ्यांनी त्यांच्या त्याग, समर्पणातून ही कला जिवंत ठेवली, वाढवली, समृद्ध केली. तमाशा कलेला लोकमान्यता, राजमान्यता मिळवून दिली. या तमाशा कलावंतांसह राज्यातील समस्त लोककलावंतांच्या मान-सन्मानाकडे, हक्कांकडे, विकासाकडे सरकारने लक्ष देण्याची गरज असल्याचेही पवार यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

तमाशा कलेला समृद्ध, लोकप्रिय करण्याच्या कार्यात तमाशासम्राज्ञी स्व. विठाबाई नारायणगावकर आणि त्यांच्या कुटुंबियांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या ज्येष्ठ बंधूंना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले असून तमाशा कलेची आयुष्यभर सेवा करणाऱ्या स्व. विठाबाईंचे अखेरचे दिवस हलाखीत गेले. बहुतांश लोककलावंतांच्या वाट्याला हेच दु:ख येते, त्यांच्या आयुष्याचा शेवट हलाखीत जातो. हे टाळण्यासाठी लोककलावंतांसाठी वृध्दापकाळात राहण्याची, जेवण्याची, औषधांची व्यवस्था केली पाहिजे. त्यांच्यासाठी वृध्दाश्रम, अल्प व्याजदरात कर्ज, मोफत आरोग्य सुविधा, मुलांच्या शिक्षणाची सोय असली पाहिजे.शासनाच्या विकास योजनांचा लाभ कलावंतांपर्यंत पोहोचवला पाहिजे. त्यासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची गरज आहे. 

राज्यातील लोक कलावंतांकडूनही सातत्याने ही मागणी होत असून राज्य शासनाने नुकत्याच घोषित केलेल्या सात महामंडळांबरोबर या महामंडळाचीही घोषणा होईल, ही अपेक्षा होती. परंतु, तसे न घडल्याने, राज्यातील लाखो लोक कलावंतांचा अपेक्षाभंग झल्याकडेही पवार यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.

राज्यातील लोककलावंतांची आग्रही मागणी लक्षात घेऊन राज्य सरकारने, लोक कलावंतांसाठी तमाशा सम्राज्ञी स्व. विठाबाई नारायणगावकर यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय तातडीने घ्यावा, महामंडळासाठी भरीव आर्थिक तरतूद करावी, महामंडळाचे कामकाज लवकरात लवकर सुरु करुन लोक कलावंतांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणीही विरोधी पक्षनेते पवार यांनी पत्रात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here