काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांचा इशारा

By Anant Nalawade

Twitter: @nalawadeanant

मुंबई: रत्नागिरी येथील बारसू रिफायनरी स्थळी स्थानिक नागरिक महिला मुले सर्वजण रिफायनरी सर्वेक्षणाविरोधात आंदोलन करत आहेत. आज पोलिसांनी त्यांच्यावर व वार्तांकन करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींवर दडपशाही सुरु केली आहे. हे अत्यंत निषेधार्ह असून सरकारने ही दडपशाही आणि सर्वेक्षण तात्काळ थांबवावे, अशी मागणी विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी येथे केली.

बारसू रिफानरी संदर्भात बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, मुंबई- वडोदरा एक्स्प्रेसच्या नावाखाली मागच्या आठवड्यात गरीब आदिवासी लोकांच्या जमिनी बळजबरीने ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी महिलांवर लाठी हल्ला केला. काल अंधारात मुंबईतील आरेमधील शेकडो झाडे पोलीस बंदोबस्तात तोडली गेली. या घटना ताज्या असताना कालपासून कोकणाचा निसर्ग उध्वस्त करणाऱ्या बारसु रिफायनरीचा विरोध करणाऱ्या स्थानिक राहिवाशांवर पोलिसांनी दमदाटी सुरू केली आहे. या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात सुरू असताना मुख्यमंत्री महोदय सुट्टीवर गेले आहेत आणि उपमुख्यमंत्री चकार शब्द काढायला तयार नाहीत. बारसू रिफायनरीत कोणाचे हितसंबंध अडकले आहेत काय? विकासाच्या नावाखाली जनतेला वेठीस धरणे चुकीचे आहे. स्थानिक जनता जर रिफायनरीला विरोध करत असेल तर त्यांच्याशी सरकार चर्चा का करत नाही? असे सवालही थोरात यांनी विचारले.

सरकारच्या गलथानपणामुळे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात १४ नागरिकांचा मृत्यू झाला. बारसू परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक आंदोलन करत असताना त्यांच्यावर दडपशाही करून सरकारला शेतक-यांचे बळी घ्यायचे आहेत का ? शिंदे फडणवीस सरकारने ही दादागिरी तात्काळ थांबवावी, असा इशाराही थोरात यांनी यावेळी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here