मुंबईत चिंता वाढली
Twitter: @maharashtracity
मुंबई: मुंबईत बुधवारी एकाचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने चिंता वाढली आहे. या पूर्वी 17 जानेवारी रोजी मुंबईत कोविड मृत्यू नोंदविण्यात आला होता. आतापर्यंत मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १९,७४८ मृत्यू झाले असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, बुधवारी झालेला मृत्यू एम पूर्व वॉर्ड चेंबूर येथील 69 वर्षीय पुरुष असल्याचे सांगण्यात आले. ते सहव्याधीचे रूग्ण होते. उच्च रक्तदाब तसेच हायपो थायरॉडिझमग्रस्त होते. त्यांना एकच दिवस रुग्णालयात ठेवण्यात आले होते. तर मृत्यूच्या कारणात कार्डियोजेनिक शॉकसह सेप्सिस गंभीर डाव्या वेंट्रिक्युलर डिसफंक्शन तीव्र मूत्रपिंडाच्या दुखापतीसह कोविड-19 संसर्ग झाला असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, राज्यात बुधवारी ५६९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ८१,४६,८७० झाली आहे. काल ४८५ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ७९,९४,५४५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१३% एवढे झाले आहे.
राज्यात बुधवारी दोन कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,६६,६४,३८७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१,४६,८७० (०९.४० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज रोजी एकूण ३८७४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेंच सध्याच्या कोविड संदर्भातील आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या सूचनेनुसार २४ डिसेंबर २०२२ पासून राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. या मध्ये सर्व प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत असून २ टक्के प्रवाशांचे नमुने कोविडसाठी घेण्यात येत आहेत. यापैकी कोविड बाधित आलेला प्रत्येक नमुना जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात येत आहे.
आज सकाळपर्यंत विमानतळावरील या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
आतापर्यंत १७,०४,४२९ एकूण आलेले प्रवासी आंतरराष्ट्रीय विमानतळांवर आले असून यातील ३७,९८२ प्रवाशांची आर टी पी सी आर करण्यात आली. तसेच आर टी पी सी आर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी ५८ प्रवाशांचे नमुने पाठविण्यात आले. आतापर्यन्त आढळलेल्या ५८ रुग्णांपैकी बारा रुग्ण मुंबई, अकरा रुग्ण पुणे, नवी मुंबई, अमरावती, सांगली, औरंगाबाद, सातारा, नागपूर प्रत्येकी एक रुग्ण आणि सहा रुग्ण गुजरात, पाच रुग्ण उत्तर प्रदेश, तीन रुग्ण केरळ तर तामिळनाडू, राजस्थान, ओडीसा, वेस्ट बंगाल प्रत्येकी दोन, आणि गोवा, आसाम, बिहार, तेलंगाना, हैदराबाद, चेन्नई, पंजाब येथील प्रत्येकी एक रुग्ण असे असल्याचे सांगण्यात आले.