By Sadanand Khopkar
Twitter: @maharashtracity
मुंबई: लव्ह जिहाद’ या विषयावर आज विधानसभेत जोरदार शाब्दिक चकमकी झडल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेस सदस्य डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या लव्ह जिहाद नव्हे आंतरधर्मीय विवाह अशी संभावना करणाऱ्या आणि त्यांचे समर्थन करणारे समाजवादी पक्षाचे सदस्य अबू आझमी यांना भाजप सदस्य आशीष शेलार (Ashish Shelar targetted Abu Azami over Love Jihad issue) यांनी धारेवर धरले.
हिंदू मुलींवरील अत्याचार थांबविण्यासाठी कायदा हवा, अशी आग्रही मागणी केली.
महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा (Minister Mangal Prabhat Lodha) यांनी बुधवारी राज्यात लव्ह जिहादसंबंधी जवळपास एक लाख प्रकरणे घडल्याची माहिती सभागृहाला दिली होती. राष्ट्रवादीच्या आव्हाड यांनी कामकाज पद्धती विषयक मुद्दा उपस्थित करून तो विषय छेडला. समाजात दुफळी निर्माण करण्याचे काम करू नका. तुम्ही ज्याला ‘लव्ह जिहाद’ म्हणता, त्याला आंतरधर्मीय विवाह म्हणतो. एक लाख नव्हे केवळ तीन हजार ६९३ प्रकरणे आहेत असे आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांनी म्हणताच भाजप आणि शिवसेना सदस्य संतप्त झाले.
लव्ह जिहाद अशी कोणतीही गोष्ट नाही, मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सभागृहात चुकीची माहिती देऊ नये, धर्माच्या आधारे लोकांना भडकवू नका, त्यांनी माफी मागितली पाहिजे, या अबू आझमी यांच्या वक्तव्याने सत्ताधारी सदस्य अधिकच चिडले.
ज्याची मुलगी लव्ह जिहादला बळी पडते, त्या बापाला आत्महत्येविना पर्याय राहात नाही. लव्ह जिहादमध्ये फसवून मुलींना दुबईत विकले जाते. मतांच्या लांगुलसाठी बोलत असाल तर हे निषेधार्हच होय या शब्दांत पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आझमी यांना पत्त्यूत्तर दिले.
मंत्र्यांवर आरोप करायचे असतील, तर आव्हाड यांनी तशी आधी नोटीस द्यायला हवी. ‘लव्ह जिहाद’ विषयी चर्चा करायला आम्ही तयार आहोत. हिंदु मुलींवर अन्याय, अत्याचार थांबण्यासाठी कायदा आलाच पाहिजे. एकाही हिंदु महिलेवर अत्याचार झाला, तरी आम्ही बोलणार. लव्ह जिहादचे हे प्रकरण दाबण्याचा हा प्रकार आहे, असा आरोप करीत भाजप सदस्य शेलार यांनी आव्हाड यांना अंगावर घेतले.
शिवसेना-भाजप यांच्या आक्रमक भूमिकेमुळे जितेंद्र आव्हाड हेही उत्तर देण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, विरोधी पक्षनेते अजित पवार (LoP Ajit Pawar) यांनी वादविवाद थांबवण्याचे आवाहन केले.