By Anant Nalawade
Twitter: @nalawadeanant
मुंबई: उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून खाली खेचले, त्यानंतर राज्यात ज्या काही घडामोडी घडल्या त्यावेळी आम्ही घाबरलो नाही. तर आता व्हीप बजावला असे सांगून आम्हाला कुणी घाबरवू पाहात असेल तर आम्ही घाबरणारे नाही, असा इशारा ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी सोमवारी शिवसेनेला (Shiv Sena) दिला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटाला शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे विधिमंडळात शिवसेना हा आता एकच पक्ष आहे. तथपि शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) ठाकरे गटाच्या १५ आमदारांना व्हीप बजावणार नाही, अशी तोंडी हमी दिली आहे. तरीही शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरतशेठ गोगावले यांनी शिवसेनेच्या ५५ आमदारांना व्हीप बजावला असून त्यात ठाकरे गटाचाही समावेश आहे. यावर आज भास्कर जाधव यांनी विधिमंडळ परिसरात प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना शिंदे गटाच्या व्हीपला (Whip) आपण भीक घालणार नसल्याचे स्पष्ट केले.
उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रिपद गेले, आमच्यावर खोट्या केसेस दाखल केल्या गेल्या, आमची सुरक्षा काढली, त्यामुळेही आम्ही घाबरलो नाही. महाराष्ट्रातील सुसंस्कृत राजकारण जर कुणी संपवले असेल तर ते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी संपवले. देवेंद्र फडणवीस उसनं अवसान आणून वक्तव्य करत आहेत. त्यांच्याकडे महाराष्ट्र गांभीर्याने पाहात नाही, असेही जाधव यांनी यावेळी स्पष्ट केले.
परिशिष्ट १० चा उल्लेख करण्याचा यांना अधिकार आहे का? हा कायदा तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या (Atal Bihari Vajpayee) कालावधीत जो पक्षांतर्गत बंदी विरोधी कायदा करण्यात आला त्यामध्ये हे परिशिष्ट १० समावेश करण्यात आले होते, अशी आठवण करून देताना भास्कर जाधव म्हणाले, ज्यांना पक्षातून बाहेर पडायचे असेल त्यांनी खुशाल पक्षातून बाहेर पडावे आणि स्वतःचा पक्ष स्थापन करावा. मूळ पक्ष हा त्यांचा पक्ष राहात नाही. तसेच पक्षाची निशाणी ही देखील त्यांची राहात नाही. वाजपेयींना अशी तोडफोड आणि फूट मान्य नव्हती. त्यामुळेच अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते की तोडफोड करून, फोडाफोडी करून कुणी राजकारण करत असेल आणि सत्ता आणत असेल तर अशा सत्तेला मी चिमट्यानेही हात लावणार नाही, असे जाधव यांनी यावेळी नमूद केले.
आज राज्यात शेतकरी हवालदिल झाले आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे काय झाले ? मूळ जुनी पेन्शन योजना होती त्याचे काय झाले ? धनगर समाज, लिंगायत समाज यांच्या आरक्षणाचे काय झाले ? असे सवाल करत यांना कुणाशाही काहीही देणंघेणं नाही. हे फक्त सत्तापिपासू लोक आहेत. येणारी निवडणूक पैशांच्या मार्गाने, जोर-जबरदस्तीने जिंकायची आहे. त्यांना जनतेच्या प्रश्नांशी, शेतकऱ्यांशी काहीही देणंघेणं नाही, अशी टीकाही जाधव यांनी केली.