By Anant Nalavade
Twitter: @nalavadeanant
मुंबई: मुंबईत काही दिवसांपूर्वी पवई येथील आय आय टी मधील दलित विद्यार्थ्याने आत्महत्या केली. (Suicide of Dalit Student) या प्रकरणाची गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या समितीद्वारे सखोल चौकशी करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी बुधवारी केली.
पुन्हा कोणताही विद्यार्थी आत्महत्या करणार नाही, याची आय आय टी प्रशासनाने खबरदारी घ्यावी, असे सांगत मयत दलित विद्यार्थी दर्शन सोळंकी यांच्या कुटुंबियांना आय आय टी ने सांत्वनपर आर्थिक मदत द्यावी, अशीही मागणी रामदास आठवले यांनी केली.
दर्शन सोळंकीची आत्महत्या ही दुसरी दुर्दैवी घटना आहे. यापूर्वी सन 2014 मध्ये अंभोरे नावाच्या विद्यार्थ्याने आय आय टी पवईत (IIT Bombay) आत्महत्या केली होती. याबाबत रामदास आठवले यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून दलित विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटना थांबविण्यासाठी आय आय टी प्रशासनाने खबरदारी घेतली पाहिजे, अशी सूचनाही आठवले यांनी केली.
ग्रामीण भागातून दलित, मागासवर्गीय गरीब विद्यार्थी आय आय टी मध्ये प्रवेश घेतात. त्यांची इंग्रजी भाषेवर पकड मजबूत करण्यासाठी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी आय आय टी मध्ये विशेष प्रशिक्षण वर्ग घेतला जातो. तसेच आय आय टी पवईमध्ये २ हजार अनुसूचित जाती- जमातीचे विद्यार्थी शिकत आहेत. त्यांच्या तक्रारी दूर करण्यासाठी आय आय टी पवईत एस सी, एस टी फोरम स्थापन केलेला आहे, अशी माहिती आय आय टी प्रशासनाने दिली.
मयत दलित विद्यार्थी दर्शन सोळंकी याचे त्यांच्या वडिलांशी बोलणे झाले होते. त्याला एका विषयाचा पेपर कठीण गेला होता. त्यामुळे त्याच्या वडिलांनी दर्शनला हिम्मत देऊन पुन्हा गावी अहमदाबाद, गुजरातला जाऊन मी येत आहे, असा निरोप दिला होता. तरीही लगेच दर्शन सोळंकीने आत्महत्या केली हे दुःखद आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून यात जातिवाद आहे की अन्य काही कारण आहे, याचा शोध पोलीस यंत्रणेने घेतला पाहिजे, अशी सूचना आठवले यांनी केली.
त्यासाठी आपण उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेऊन गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी समिती नेमून दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करणार असल्याचेही आठवले यांनी सांगितले.