By सचिन उन्हाळेकर

Twitter: @Sachin2Rav

मुंबई: भायखळा पूर्व परिसरातील वीर माता जिजाबाई भोसले उद्यानाच्या परिसरात आयोजित उद्यान प्रदर्शनात यंदा पानाफुलांपासून तयार केलेल्या कार्टूनची सफर तुम्हाला करता येणार आहे. बच्चेकंपनीकरिता खास आकर्षण असलेल्या या उद्यान प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा आज अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांच्या हस्ते पार पडले. हे उद्यान प्रदर्शन ५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत सकाळी ८ ते रात्री ८ या कालावधीत सर्वांना मोफत पाहता येणार आहे.

या वार्षिक प्रदर्शनासोबतच उद्यान (Garden exhibition) या विषयाशी संबंधित विविध ११ बाबींवरील कार्यशाळांचे आयोजनही प्रदर्शन कालावधीदरम्यान करण्यात आले आहे. तर प्रदर्शनासोबतच उद्यान विषयक वस्तुंच्या विक्रींची ४२ दालने देखील या ठिकाणी उभारण्यात आली आहेत, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.

दरवर्षीच्या वार्षिक उद्यान प्रदर्शनामध्ये पाना-फुलांचा वापर करुन वैविध्यपूर्ण रचना सादर करण्यात येतात. या रचनांना देखील मुंबईकर नागरिकांचा आणि विशेष करुन लहान मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असतो. यंदाच्या प्रदर्शनात पेपा पिग फॅमिली, माशा अँड द बियर, ब्लुई, ट्वीटी आणि सिल्व्हेस्टर यांच्यासह नानाविध ‘कार्टून्स’ च्या रचना पानाफुलांपासून साकारण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर पाना-फुलांपासून साकारलेले ‘जी २०’ चे बोधचिन्ह आणि ‘जी २०’ सदस्य देशांमधील झाडे – फुले आणि भाज्या यांचा देखील समावेश यंदाच्या उद्यान प्रदर्शनात आहे.

यासोबतच कुंड्यांमध्ये वाढविलेली फळझाडे व फुलझाडे, फळभाज्यांची झाडे, मोसमी फुलझाडे, औषधी वनस्पती, बोनसाय यांचे अक्षरशः शेकडो प्रकार मुंबईकरांना या प्रदर्शनात पहायला मिळत आहेत. तसेच मुंबई परिसरात अत्यंत दुर्मिळ असणाऱ्या कृष्णवडासारख्या अनेक दुर्मिळ देशी प्रजातींची झाडे देखील यंदाच्या प्रदर्शनात बघता येतील.

कोविड प्रादुर्भावामुळे दोन वर्षाच्या खंडानंतर होत असलेले यंदाचे उद्यान प्रदर्शन हे अधिक संस्मरणीय व्हावे, यासाठी महानगरपालिकेच्या उद्यान खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अक्षरशः दिवस-रात्र मेहनत घेतली असून ही मेहनत प्रदर्शन बघताना प्रत्येक ठिकाणी जाणवत आहे, अशी प्रतिक्रिया प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

उद्यान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी उपायुक्त (शिक्षण) केशव उबाळे, उप आयुक्त (उद्याने) किशोर गांधी, ‘इ’ विभागाचे सहाय्यक आयुक्त अजयकुमार यादव, संचालक (प्राणिसंग्रहालय) संजय त्रिपाठी, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर व पर्यावरण प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here