By Abhay Kumar Dandage 

Twitter: @maharashtracity

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये चांगलेच यश मिळेल असे राजकीय भाकीत वर्तविले जात आहे. देशाच्या हितासाठी केंद्र सरकार काय काम करत आहे हे सर्व जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. असे असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करू पाहणाऱ्या इतर राजकीय पक्षांनी आपापल्या परीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. २०२४ मध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे. त्या दृष्टीने महाराष्ट्रातील मराठवाडा शेजारी असलेल्या तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री केसीआर हे भारत राष्ट्र समिती अर्थात ‘बीआरएस’ या त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश करणार आहेत. यासाठी त्यांनी मराठवाड्याची पाऊलवाट निवडली आहे. 

मराठवाडा हा तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेला भाग आहे. महाराष्ट्रातील राजकारणात प्रवेश करण्यासाठी यापूर्वी देखील तेलंगणा येथील एम. आय. एम. या राजकीय पक्षाने नांदेडच्या माध्यमातून मराठवाड्याच्या राजकारणात व त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश केला होता. एम आय एम या पक्षाचे नेते ओवेसी यांच्या पक्षाने नांदेडमध्ये महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती. त्यामध्ये एमआयएमचे १३ नगरसेवक निवडून आले होते. त्याच पद्धतीने परंतु त्यापेक्षा काही वेगळी रणनीती आखत तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी आर हे पाच फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये राजकीय सभा घेणार आहेत. त्या सभेच्या माध्यमातून के सी आर यांच्या भारत राष्ट्र समितीची मराठवाड्यात एन्ट्री होणार आहे. 

बी आर एस हा महाराष्ट्रासाठी नवीन पक्ष असला तरी तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी आर यांना त्यांच्या पक्षाची ताकद येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून दाखवून द्यायची आहे. मराठवाड्यातील सीमावर्ती भागातील नागरिक मागील सहा महिन्यांपासून केसीआर यांच्या संपर्कात होते. सात महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात झालेली राजकीय उलथापालथ ही देखील के सी आर यांच्या मराठवाडा प्रवेशाचे कारण असू शकते. 

महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची सध्याची अवस्था पाहता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आपल्याकडे वळविण्यासाठी भारत राष्ट्र समिती छुप्या पद्धतीने कामाला लागली आहे. मराठवाड्यातील सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांना घरोघरी जाऊन भेटण्याचे काम भारत राष्ट्र समितीच्या खासदारांनी तसेच आमदारांनी सुरू केले आहे. तेलंगणा राज्यातील निजामाबाद जवळील आरमुरचे नेतृत्व करणारे आमदार जीवन रेड्डी तसेच मंचरियाल जिल्ह्यातील चेन्नूरचे नेतृत्व करणारे आमदार बलका सुमन, त्याचबरोबर माजी मंत्री व आदीलाबादचे आमदार जोगु रमन्ना व कामारेड्डीजवळील जुक्कल येथील आमदार हनुमंत शिंदे व करीमनगरचे माजी महापौर रवींद्र सिंग हे सध्या भारत राष्ट्र समितीचे प्रमुख या नात्याने मराठवाड्यात नांदेड, लातूर, हिंगोली या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. नांदेडला तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी आर यांच्या सभेसाठी ही मंडळी नांदेडमध्ये तळ ठोकून सभेचे नियोजन करत आहेत. 

नांदेड जिल्ह्यातील बिलोली, धर्माबाद, भोकर या सीमावर्ती भागात त्यांनी बी आर एस मध्ये येऊ पाहणारे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी व नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी आर यांच्या महाराष्ट्रातील नांदेडमध्ये होणाऱ्या पहिल्या जाहीर सभेत मराठवाड्यातील अनेक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश करतील असा दावा या नेत्यांनी केला आहे. 

शिवसेनेचे दोन गट झाल्यानंतर ज्या शिवसेनेच्या नेत्यांनी कुठल्याही गटात प्रवेश केला नाही अशा नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना गळ घालत भारत राष्ट्र समितीच्या नेत्यांनी त्यांना आपल्या पक्षात ओढण्याचे राजकारण सुरू केले आहे. मराठवाड्याच्या शेजारी असलेल्या तेलंगणा राज्यात शेतकऱ्यांसाठी अनेक सवलती व योजना आहेत. त्याच योजना मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मिळतील ही आशा दाखवत तेलंगणातील भारत राष्ट्र समिती या राजकीय पक्षाने सुरुवातीला शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यांना तेलंगणातील अनेक सवलतींची माहिती दिली व त्यांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये अनेक शेतकरी नेते व शेतकरी भारत राष्ट्र समितीच्या गळाला लागले आहेत. याशिवाय शिवसेना व काँग्रेस या पक्षावर नाराज असलेल्या व या दोन्ही पक्षामधून बाजूला सारलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांना भारत राष्ट्र समितीने आपल्या जाळ्यात ओढले आहे. 

शेतकरी तसेच नाराज नेते व पदाधिकारी यांच्या जीवावर भारत राष्ट्र समितीने आपली राजकीय वाटचाल सुरू केली आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका तसेच विधानसभा व लोकसभा या सर्व निवडणुका लढविण्याच्या दृष्टीने भारत राष्ट्र समिती मराठवाड्यात कामाला लागेल, असा दावा या पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. भारताचे नेतृत्व नरेंद्र मोदी हेच समर्थपणे करू शकतात असे देशातील बहुतांश नागरिकांना वाटत असताना मराठवाड्याच्या दिशेने महाराष्ट्राच्या राजकारणात एंट्री घेणाऱ्या बीआरएस पक्षाला कितपत यश मिळेल हे येणारा काळच सांगू शकेल.

भारत राष्ट्र समितीने नांदेडमध्ये सभा घेण्याचे जाहीर केल्यानंतर काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांची डोकेदुखी वाढली आहे. अशोक चव्हाण यांचा गड असलेल्या भोकर येथे सुरुवातीला भारत राष्ट्र समितीची सभा होईल, असे सांगितले जात होते. परंतु त्यापेक्षा नांदेडमध्ये सभा घेतल्यास ती चर्चा महाराष्ट्रात होईल, यादृष्टीने मुख्यमंत्री के सी आर यांनीच नांदेडमधील सभा निश्चित केली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी आर यांच्यासाठी मराठवाड्याची ही पाऊलवाट असली तरी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात त्यांनी राजकीय एंट्री घेतली आहे, हे मात्र निश्चित.

(लेखक अभयकुमार दांडगे हे नांदेड येथील पत्रकार आहेत. त्यांना ९४२२१७२५५२ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here