Twitter: @maharashtracity
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उजव्या डोळ्यावर मंगळवारी मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली. मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांना सोमवारी दाखल करण्यात आले होते. दरम्यान मंगळवारी झालेली मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी झाली असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.
शरद पवार यांच्यावर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात करण्यात आली. मात्र डोळ्यांची काळजी घेण्यासाठी १८ जानेवारीपर्यंत विश्रांती घेण्यास सुचविण्यात आले आहे. पवार यांच्या डाव्या डोळ्यावर डिसेंबर महिन्यात मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आता सुचविण्यात आलेल्या विश्रांतीदरम्यान ते घरातून कामकाज करू शकतील. ते घरात बैठका घेऊ शकणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
शरद पवार यांच्यावर गेल्या वर्षी मार्च महिन्यात ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तसेच पोटदुखीमुळे त्यांना ऑक्टोबर महिन्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर एन्डोस्कोपीद्वारे पित्ताशयातील खडे काढून टाकण्यात आले. त्यानंतर त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला होता. मात्र, त्यांनी हाताला पट्ट्या गुंडाळलेल्या अवस्थेत शिर्डी येथे झालेल्या त्यांच्या पक्षाच्या मेळाव्याला हजेरी लावली होती.