Twitter : @maharashtracity
मुंबई: गेल्या सहा महिन्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडून २६०० रुग्णांना एकूण १९ कोटी ४३ लाख रुपयांची मदत देण्यात आली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष नेहमीच राज्यातील हजारो गरिब गरजू रुग्णांना मदत करत असतो. यंदाच्या मदतीतून या विभागाच्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखला गेला. तर सहा महिन्यातील एकट्या डिसेंबर महिन्यात विक्रमी मदत म्हणजे तब्बल ८ कोटी ५२ लाख रुग्णांना वैद्यकीय मदत देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर रुग्ण मदतीत पहिल्याच जुलै महिन्यात १९४ रुग्णांना ८३ लाखांची मदत देण्यात आली. नंतर ऑगस्ट महिन्यात २७६ रुग्णांना १ कोटी ४० लाख, सप्टेंबर महिन्यात ३३६ रुग्णांना १ कोटी ९३ लाख, ऑक्टोबर महिन्यात २५६ रुग्णांना २ कोटी २१ लाख, नोव्हेंबर महिन्यात ५२७ रुग्णांना ४ कोटी ५० लाखाची तर डिसेंबर महिन्यात विक्रमी ८ कोटी ५२ लाख रुग्णांना वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यातील विक्रमी मदतीबाबत बोलतांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या निकषात बदल करुन काही खर्चिक उपचार असणाऱ्या आजारांचा समावेश नव्याने करण्यात आला आहे. जास्तीत जास्त गरजू रुग्णांना सहाय्यता करता यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार नवीन आजारांचा समावेश करण्यात आला. याचा सकारात्मक परिणाम म्हणून नव्याने समाविष्ट या आजारांच्या अनेक रुग्णांना मदत उपलब्ध झाली आहे. यामुळे निधीच्या वितरणात वाढ झाली असल्याचे सांगण्यात आले.