Twitter: @vivekbhavsar
काही माणसं विशिष्ट ध्येय घेऊन जन्माला येतात किंवा, काही कामं याच माणसांमुळे शक्य होतात, असे म्हणण्याचे धाडस यासाठी करतोय की हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर – मुंबई समृद्धी महामार्ग पूर्ण झाला तो केवळ विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्यमंत्री कार्यालयातील पायाभूत सुविधा विभागाचे प्रमुख राधेश्याम मोपलवार यांच्यामुळेच.
२०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्ष – शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर आले होते. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) त्यावेळी एमएसआरडीसी (MSRDC) विभागाचे मंत्री होते. एमएसआरडीसीकडे निधी नव्हता. खरे तर महामंडळ सहा हजार कोटी रुपयांच्या कर्जाखाली दबलेले होते. निधी नसल्याने शिंदे यांना कोणतेही काम करण्याची संधी नव्हती. शिंदे अशी व्यक्ती आहे की जी कधी स्वस्थ बसत नाही. शिंदे यांनीच कधीतरी बोलण्याच्या ओघात सांगितले होते की, त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले की त्यांना काम करण्याची संधी हवी आहे. फडणवीस यांनी तेव्हा नागपूर – मुंबई या संपूर्णपणे नव्या ज्याला Greenfield म्हणतात असा महामार्ग बांधण्याचे स्वप्न बघितले आणि त्याची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्या समर्थ खांद्यावर सोपवली. फडणवीस यांनी शिंदे यांच्यावर दाखवलेला विश्वास किती सार्थ होता, हे आज समृद्धी महामार्गांने प्रवास करताना सातत्याने जाणवते.
मला आठवतेय, २०१५ चे हिवाळी अधिवेशन होते अणि सुयोग या नागपुरातील पत्रकार शिबिराला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली होती. तेव्हा त्यांनी समृध्दी महामार्गाची कल्पना आम्हा पत्रकारांसमोर मांडली. या महामार्गामुळे मराठवाडा अणि विदर्भ हा औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास विभाग मुंबईची आर्थिक राजधानी मुंबईशी जोडला जाणार आहे अणि त्यातून कशी समृद्धी होणार याबद्दल ते ज्या पद्धतीने भरभरून बोलत होते, ते ऐकताना आम्ही पत्रकार देखील भारावून गेलो होतो. यथावकाश या महामार्गाचे काम सुरू झाले.
देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील हा समृद्धी महामार्ग पूर्ण करण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे अणि राधेश्याम मोपलवार यांच्याकडे सोपवण्यात आली. जमीन देण्यास अनेक शेतकऱ्यांचा सुरुवातीला विरोध होता. माझ्यासह अनेक पत्रकारांनी शेतकरी आंदोलन अणि त्यांच्या विरोधाला यथायोग्य प्रसिध्दी दिली. मीडिया विरोधात होता, असे म्हणणे योग्य होणार नाही, त्यांनी त्रुटी दाखवण्याचा प्रयत्न केला. अर्थात त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला अणि त्यांना वाढीव मोबदला मिळाला.
असे म्हटले तर वावगे होणार नाही की देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे अणि राधेश्याम मोपलवार ही टीम होती म्हणूनच हा महामार्ग कमी कालावधीत पूर्ण होवू शकला. एकीकडे मुंबई – गोवा महामार्गाचे काम गेली १५-२० वर्षे रखडले असताना (त्याला अन्य ही कारणं आहेत) समृद्धी महामार्ग – त्याची कल्पना मांडल्यापासून अवघ्या सहा वर्षात पूर्ण होऊन रहदारीसाठी खुला झाला. अर्थात नागपूर – शिर्डी इतकाच टप्पा पूर्ण झाला असून शिर्डी ते शहापूरमार्गे मुंबई हा टप्पा अजून पूर्ण होणे बाकी आहे. श्री मोपलवार अणि रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी यांना विश्वास आहे की येत्या वर्षभरात हा टप्पा देखील पूर्ण होऊन संपूर्ण ७१० किलो मीटर लांबीचा समृद्धी महामार्ग लवकरच पूर्ण होईल. आम्ही आशा करतो की २०२३ च्या हिवाळी अधिवेशनाला जाताना मुंबईपासून नागपूरपर्यंतचा आमचा प्रवास समृध्दी महामार्गाने वेगाने पूर्ण होईल.
या महामार्गाचे अवघड शिवधनुष्य पेलण्यासाठी उत्कृष्ट टीमची गरज होती. कॅप्टन देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विकासाची दृष्टी आहे. निर्णय घेण्याची क्षमता आहे. या कॅप्टनला योग्य टीम मेंबरची गरज होती. ती पूर्ण केली, श्री शिंदे अणि श्री मोपलवार यांनी. हे दोन्हीही प्रचंड कामसू अणि धाडसी निर्णय घेण्यात निष्णात आहेत. श्री मोपलवार यांनी रस्ते विकास महामंडळात एकेक हिरा शोधून योग्य जागी बसवला अणि जबाबदारी सोपवली. या टीमवर्कचा रिझल्ट आज आपल्यासमोर आहे.
नागपूरला हिवाळी अधिवेशनासाठी आल्यावर या समुद्धी महामार्गाने प्रवास करण्याचा योग आला. अनेक अधिकारी अणि आमदारांनी या महामार्गाने प्रवास करण्याचा आनंद घेतला. पुढील वर्षीही याच मार्गाने जाऊ. या महामार्गाची वैशिष्ट्ये अनेकदा प्रसिद्ध झाली आहेत. त्यामुळे त्याची पुनरावृत्ती करत नाही. पण अशी अपेक्षा करू या की नागपूर – गोवा या प्रस्तावित greenfield महामार्ग उभारण्याचे काम श्री मोपलवार अणि टीमकडे सोपवले तर तो देखील लवकरात लवकर पूर्ण होईल.
– विवेक भावसार
संपादक, Maharashtra.city
मोबाईल – 9930403073