संघाचे भाजपच्या लोकप्रतिनीधींना पाथेय
Twitter: maharashtracity
नागपूर: राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात आलेल्या लोकप्रतिनिधींनी आज, मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) रेशीमबाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसराला भेट दिली. राज्यातील सत्तापरिवर्तनानंतर हे लोकप्रतिनिधी पहिल्यांदाच संघस्थानी पोहचले होते. यावेळी या लोकप्रतिनिधींना जनतेशी संपर्क आणि संबंध कायम ठेवण्याचे पाथेय संघातर्फे देण्यात आले.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात सर्व आमदार रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरात पोहोचले. यात राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, रविंद्र चव्हाण यांच्यासह अन्य मंत्र्यांचा समावेश होता. सर्व मंत्री व आमदारांनी आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर मार्गदर्शन वर्गाला सुरुवात झाली.
संघातर्फे विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे, महानगर संघचालक राजेश लोया, महानगर सहसंघचालक श्रीधर गाडगे हे उपस्थित होते. संघ विचारधारा, कार्यप्रणाली, चालणारे उपक्रम यांची माहिती देण्यात आली. आमदारांनी जनतेसोबत जास्तीत जास्त समन्वय कसा वाढेल यादृष्टीने कार्य केले पाहिजे, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.
लोकप्रतिनिधींनी जनतेच्या समस्या डोळ्यासमोर ठेवूनच काम करावे, असे देखील यावेळी श्रीधर गाडगे यांनी सांगितले. संघातर्फे दरवर्षी नागपुरात तृतीय वर्ष वर्गाचे आयोजन करण्यात येते. या वर्गाला आमदारांनी भेट द्यावी व तेथे जवळून संघकार्य व प्रशिक्षण प्रणाली जाणून घ्यावी, असे आवाहनदेखील त्यांनी केले. यावेळी भाजप आमदारांना ‘भविष्यातील भारत’ या पुस्तकाच्या प्रती देण्यात आल्या.
रेशीमबागेत सर्व भाजप आमदारांना उपस्थिती अनिवार्य करण्यात आली होती. विधानसभा व विधानपरिषद मिळून 113 आमदारांची उपस्थिती होती. काही कारणास्तव अनुपस्थित असलेल्या आमदारांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना पूर्वकल्पना दिली होती. आ. नितेश राणे यांच्यासारखे सदस्य प्रसार माध्यमांना सहजपणे प्रतिक्रिया देतात. मात्र संघभूमीत त्यांनी सावध पवित्रा घेतला होता. संघस्थानी बोलणे योग्य होणार नाही व ती येथील परंपरा नाही, असे म्हणत त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला.