#उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात सकारात्मक चर्चा

By अनंत नलावडे

Twitter: @NalavadeAnant

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी (VBA) अर्थात शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येणार असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची युतीच्या चर्चेची पहिली बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी या युतीचे सूतोवाच केले. तसेच प्रकाश आंबेडकर यांची महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) येण्याची मानसिकता असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड (rebel in Shiv Sena) केल्यानंतर शिवसेनेला मोठा फटका बसला आहे. विशेषतः विदर्भ (Vidarbha) आणि मराठवाड्यातील (Marathwada) आमदारांनी शिंदे यांना समर्थन दिले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा भर पक्षवाढीसह नवे राजकीय मित्र जोडण्यावर आहे. गेल्या महिन्यात प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) एका कार्यक्रमात एकत्र आले होते. त्यावेळी दोघांनी भाजपविरोधात (BJP) एकत्र येण्याचे संकेत दिले होते.

या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये ठाकरे आणि आंबेडकर यांची बैठक पार पडली. या बैठकीला आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray), खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) आणि मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या चर्चेचा सविस्तर तपशील मिळू शकला नाही. मात्र, उद्धव ठाकरे यांनी आजच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले. अन्य काही बारकावे तसेच काही विषय आहेत. हे विषय चर्चेतून संपवून आम्ही लवकरच एकत्र येत असल्याचे जाहीर करू, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. प्रकाश आंबेडकर यांची महाविकास आघाडीत (MVA) येण्याची मानसिकता आहे, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर राज्याच्या राजकारणाला नवे वळण मिळू शकते. विदर्भ आणि मराठवाड्यात आंबेडकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे दोघे एकत्र आल्यास त्याचा लाभ दोघांना होऊ शकतो. दरम्यान, ठाकरे-आंबेडकर युती झाल्यास राज्याच्या राजकारणात शिवशक्ती-भीमशक्तीचा (Shiv Shakti – Bhik Shakti) तो दुसरा प्रयोग ठरेल. याआधी रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी शिवसेनेशी युती केली होती. आठवले यांचा गट शिवसेना – भाजप युतीचा(Shiv Sena – BJP alliance) घटक होता. मात्र, युती तुटल्यानंतर आठवले यांनी भाजपशी संग केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here