विकृत लोकांच्या तावडीत देश गेलाय
By मिलिंद माने
Twitter : @milindmane70
महाड: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छ.शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबाबत अपमानास्पद भाष्य केल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) यांनी आज किल्ले रायगडावर महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक होत “शिवसन्मान” आंदोलनाचा प्रारंभ केला. यावेळी त्यांनी शिवरायांचा अपमान करणाऱ्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे, अन्यथा आझाद मैदानावर एल्गार करणार असल्याचा निर्धार किल्ले रायगडावरून दिला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची हकालपट्टी करण्याच्या मागणीवर केंद्र किंवा भाजपकडून (BJP) प्रतिसाद न मिळाल्याने उदयनराजेंनी रायगडावर “निर्धार शिवसन्मानाचा” हे आंदोलन केले. शेकडोंच्या समर्थकांसह उदयनराजे भोसले रायगडावर दाखल झाले. शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला वंदन करून राजसदरेवर काही काळ ते आपल्या कार्यकर्त्यांसह आंदोलनाला बसले होते. त्यानंतर त्यांनी राजसदरेवरून आपली भूमिका मांडली. त्यात त्यांनी आझाद मैदानात (Azad Maidan) आंदोलन करण्याची घोषणा केली.
तत्पूर्वी शुक्रवारी सायंकाळी उदयनराजे महाडमध्ये (Mahad) दाखल झाले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर छत्रपती उदयनराजे रोपवेने रायगडावर पोहोचले. त्यांनी प्रथम शिरकाई देवीचे दर्शन घेतले. होळीचा माळ इथल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्याआधी उदयनराजेंनी राजमाता जिजाईंच्या समाधीचं पाचाडमध्ये दर्शन घेतले. शनिवारी उदयनराजे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह गडावर दाखल झाले.
राजसदरेवरून उदयनराजे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, काही लोक जाणीवपूर्वक देशात युगपुरुषांच्या प्रतिमेचा अवमान करत आहेत. महाराजांचा अपमान करण्याचा अधिकार कोणालाच नाही आणि महाराजांचा अपमान सहन करणेही चूक आहे, असे सांगून सर्वधर्मसमभावाचा विसर पडल्यास देशाची फाळणी उघड असल्याचा धोका देखील उदयनराजे यांनी व्यक्त केला.
महाराजांच्या विचारांचा विसर पडल्यास देश फुटला म्हणून समजा, अशी भीती उदयनराजे यांनी यावेळी व्यक्त केली. प्रत्येक राजकीय पक्ष स्वार्थी झालाय. महाराजांचे नाव घेतात पण विचार मात्र विसरतात. यामुळे देशाचे ३० तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. ‘स्वार्थी, व्यक्तिकेंद्री राजकारण झाले आहे, असे सांगत शिवाजी महाराजांच्या वक्तव्यावरुन उदयनराजे यांनी सर्व राजकीय नेत्यांना टोला लगावला.
ते म्हणाले, महाराजांच्या अपमान करणाऱ्यांच्या चुकीवर पांघरुण घालताना लाज वाटली पाहिजे. राज्यापाल पदावरुन महापुरुषांचा अपमान आणि खिल्ली उडवत असताना आपण बघत बसलो आहोत. महाराजांचा अपमान आपला सर्वांचा अपमान आहे. विकृत लोकांच्या तावडीत देश गेलाय. पदावर बसलेले लोक रयतेमुळे आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. अपमान झाल्यावर गप्प बसले, नीतीमत्ता गेली कुठे?, ‘चूक ती चूक पांघरुण घालणाऱ्यांना जागा दाखवायची वेळ आली आहे, असा इशारा उदयनराजे यांनी यावेळी भाजप आणि राज्यातील सत्ताधारी पक्ष नेत्यांना दिला.
राज्यपालपदावरून कोश्यारींना हटवण्यासाठी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांना पत्र पाठवल्यानंतरही कारवाई न झाल्याने उदयनराजे यावेळी संताप व्यक्त केला.