Twitter :@maharashtracity
मुंबई: मुंबईत एचआयव्ही बाधितांची (HIV patients) संख्या सतत घटत असून एड्स मृत्यू संख्येतही घट होत चालली असल्याचे समोर येत असल्याची माहिती मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेकडून देण्यात आली. ही माहिती गेल्या सहा वर्षांची असून यात कोरोना काळातील (corona pandemic) बाधितांची तसेच मृत्यूचे प्रमाणही देण्यात आले आहे. एचआयव्ही बाधितांचे घटते प्रमाण हे दिलासादायी वृत्त आजच्या १ डिसेंबर या जागतिक एड्स दिनाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आले.
मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेकडून २०१७ ते २०२२ या सहा वर्षातील एचआयव्ही चाचण्या, बाधित तसेच मृत्यूची माहिती देण्यात आली. गेल्या सहा वर्षात बाधितांमध्ये टप्प्याटप्प्याने घट होत चालली आहे. तर यंदाच्या २०२२ ऑक्टोबर पर्यंतच्या मृत्यूच्या माहिती नुसार एचआयव्ही बाधित मृत्यूची नोंद तीन अंकात करण्यात आली असून ती ४८७ एवढी आहे. मात्र, न घाबरता एचआयव्ही करुन घेण्याचे आवाहन ही संस्थेकडून करण्यात आले. सांगितलेल्या माहितीनुसार २०१७-१८ या वर्षात ५ लाख ५० हजार ९३० जणांची एचआयव्ही चाचणी करण्यात आली. यातून ५ हजार ८५४ जण पॉझिटीव्ह आढळले. तर १ हजार ४६८ जणांना एचआयव्हीने मृत्यू झाला. तसेच २०१८-१९ या वर्षात ६ लाख ४२ हजार ८५३ जणांची एचआयव्ही चाचणी करण्यात आली. यातून ५ हजार १११ जण पॉझिटिव्ह आढळले. तर १ हजार २७४ जणांचा मृत्यू झाला. तसेच २०१९-२० या वर्षात ६ लाख ४८ हजार ९०९ जणांची एचआयव्ही चाचणी करण्यात आली. यातून ४ हजार ६२३ जण पॉझिटिव्ह आढळले. तर या वर्षी १ हजार २६५ जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले.
मात्र २०२०-२१ या वर्षात ३ लाख ५१ हजार २० जणांची एचआयव्ही चाचणी करण्यात आली. ही चाचणी संख्या उपरोक्त वर्षांच्या तुलनेत कमी असून कोरोना काळ सुरु असल्याने चाचण्यांची संख्या कमी झाली. मात्र यातून २ हजार १५३ जण पॉझिटिव्ह आढळले. तर या वर्षी १ हजार १५८ जणांचा मृत्यू झाला. तर कोरोना उपरांत सुरु झालेल्या २०२१-२२ या वर्षात ५ लाख ३७ हजार ३६६ जणांची एचआयव्ही चाचणी करण्यात आली. यातून ३ हजार १७९ जण पॉझिटिव्ह आढळले. तर या वर्षी १ हजार २४५ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. तसेच २०२२ ऑक्टोबर पर्यत ३ लाख ५८ हजार २८९ जणांची एचआयव्ही चाचणी करण्यात आली. यातून १ हजार ९६७ जण पॉझिटिव्ह आढळले. तर ४८७ जणांचा मृत्यू झाला. गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत ही मृत्यू संख्या सर्वात कमी आहे.