@maharashtracity

मुंबई: जलसंधारण आणि पर्यावरण पूरक जीवनशैली यावर संशोधन करून पर्यावरण समतोल राखण्यासाठी युनिसेफ (UNISEF) आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सात लाख तरुण  हवामान बदलाचे योद्धे म्हणून कार्य करणार आहेत, अशी माहिती  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली.

मुंबई विद्यापीठ येथे उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि युनिसेफ यांच्यातील सामंजस्य करारावर (MOU) आज स्वाक्षरी करण्यात आली. मंत्री पाटील म्हणाले, हवामान बदलाचा धोका (threat of climate change) आणि भविष्यातील पाण्याची निर्माण होणारी टंचाई  लक्षात घेऊन राज्य शासनाने सन 2014-19 या कालावधीत जलयुक्त शिवार योजना (Jal Yukta Shivar Scheme – JYS) राबवली.  त्यामुळे पाण्याचा साठा वाढला आणि लोकांमध्ये पावसाचे पाणी कसे साठवले पाहिजे, याबाबत जनजागृती निर्माण झाली.

नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण, बदलत्या हवामानाला प्रतिसाद देण्यासाठी आणि पाण्याची बचत करण्यासाठी तरुणांना एकत्र आणण्याचा निश्चय केला आहे. जलसंधारण (water çonservation) आणि पर्यावरण पूरक जीवनशैली याबाबत महाराष्ट्रातील सात लाख तरुण ‘पाणी आणि पर्यावरण आर्मी’ म्हणून कार्य करतील आणि या विषयांवर संशोधन करतील. त्याच बरोबर या विषयांवर कार्य करणाऱ्या सामजिक संस्थांची मदत घेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यत ही चळवळ पोहोचवण्यासाठी सहकार्य करतील असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी म्हणाले की, भविष्यातील बदलांना चालना देण्याबरोबरच राज्यातील जलसंवर्धनाचे कार्य अधिक वाढेल यासाठी प्रयत्न करण्यात येत  आहे. यामध्ये तरुणांची नोंदणी, प्रशिक्षण आणि संस्था/समुदायातील जलसंधारणाबाबत निवडक विद्यापीठांच्या माध्यमातून कृती आराखडा याचा समावेश आहे. 

कौन्सिल ऑन एनर्जी एन्व्हायर्मेंट अँड वॉटर इंडियाने २०२१ मध्ये प्रसिद्ध केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील अहवालानुसार, आसाम आणि आंध्र प्रदेशनंतर हवामान धोक्याच्या पातळीवर असलेले महाराष्ट्र हे तिसरे राज्य आहे. या सहकार्य कराराचा उद्दिष्ट युनिसेफच्या सहाय्याने पर्यावरण संवर्धनाला चालना देण्याचे कार्य करण्यात येत आहे.

राजेश्वरी चंद्रशेखर  म्हणाल्या की, आगामी काळामध्ये युनिसेफने हवामान बदलावर कृती आणि तरुणांचा सहभाग हा प्रमुख कार्यक्रम डोळ्यासमोर ठेवला आहे. “इजिप्तमधील कॉप२७ परिषदेच्या पार्श्वभूमीवर युनिसेफ मुंबई कार्यालयासाठी हा एक महत्त्वाचा क्षण असून युनिसेफ हवामान धोरण आणि त्यासंबंधित कृतीत तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहे. राज्यभरातील आणखी २४ लाख तरुणांच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाअंतर्गत तरुणांना तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने पाणी, पर्यावरण आणि शाश्वततेच्या मुद्द्यांवर सामूहिक कृती करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल आणि  त्यांचा आत्मविश्वास वाढवून ते उद्याचे जबाबदार नागरिक व्हावे अशी आमची इच्छा आहे.

या प्रकल्पात एनएसएस युनिट, मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठ येथील तरुणांचा सहभाग असेल. तसेच मुंबई, पुणे, पालघर, नागपूर, कोल्हापूर, ठाणे, औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर, जालना, अहमदनगर, सातारा, बीड या शहरांमधून आणि जिल्ह्यांमधून हवामान बदलासंदर्भात काम करणाऱ्या संस्थांचीही मदत घेण्यात येणार आहे.

शहरी भागातील पाण्याच्या वाढत्या समस्या आणि प्रदूषण लक्षात घेता ६० टक्के शहरी तरुणांचा या कार्यक्रमामध्ये सहभाग असेल. या सहकार्यामुळे तरुणांना जलसंधारणाच्या क्षेत्रात विविध व्यावसायिक संस्थांसोबत काम करण्यासाठी प्रशिक्षण, फील्डवर्क आणि प्रत्यक्ष तज्ज्ञांबरोबर काम करण्याचा अनुभव मिळेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या सहभागासाठी फेलोशिप, प्रमाणपत्रे, महाविद्यालयातील ग्रेड, ग्रीन स्किलिंग, मार्गदर्शन आणि केस स्टडीज आदी गोष्टी देण्यात येणार आहेत.

जलसंवर्धन कार्यक्रम प्रत्यक्षात राबवताना नियमित निरीक्षण नोंदणी आणि अहवाल बनवण्यासाठी ‘वॉटर फूटप्रिंट ऍप्लिकेशन डॅशबोर्ड विकसित करण्यात येईल. त्यात स्वयंसेवकांची भरती / नोंदणी डेटाबेस, तरुणांची संख्या आणि लोकांपर्यंत पोहोचल्याच्या नोंदी, कृती अहवाल आणि बचत केलेल्या अंदाजे पाण्याचे मोजणी आदींची शास्त्रशुद्ध मांडली केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here