By सचिन उन्हाळेकर

@maharashtracity

मुंबई: आंबेडकरी अनुयायांना भर उन्हात रांगेत उभे करून किंवा वाहन उभे करून भोजनदानाचे वाटप न करता सेवाभावी संस्थासोबत राजकीय मंडळी आणि कंपनीच्या युनियनने त्यांनी भोजनदान स्वरूपात आणलेले जेवण, पाणी, चहा, नाश्ता सर्व शिवाजी पार्क येथील एका ठिकाणी एकत्रित जमा करून स्वतः च्या हातांनी अनुयायांना द्यावे. याकरिता मुंबई महापालिकेने (BMC) पुढाकार घ्यावा. तसेच मैदानातील टेबल खुर्च्यांची संख्या वाढवावी, जेणेकरून हजारो अनुयायांना एकाचवेळी भोजनदानाचा लाभ घेता येईल, अशी सूचना आंबेडकरी जनतेतून पुढे आली आहे.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून लाखोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायांचा (Ambedkari followers) निळा महासागर दादर येथील चैत्यभूमी येथे दरवर्षी ६ डिसेंबर रोजी पाहायला मिळतो. चैत्यभूमीवर (Chaitya Bhumi) आलेल्या आंबेडकरी अनुयायांना काही स्वयंसेवी संस्था, राजकिय पक्षांकडून तसेच दानशूरांकडून भोजनदान केले जाते. हे भोजनदान चहा, पाणी, नाश्ता आणि जेवणाच्या स्वरूपात असते. मात्र, भोजनदान करताना आंबेडकरी अनुयायांना भर उन्हात रांगेत उभे केले जाते. कित्येकजण शिवाजी पार्कच्या रस्त्यावर वाहन उभे करून तिथे जेवण वाटप करतात. अशावेळी मोठ्या प्रमाणात झुंबड उडते. रस्त्यावर अस्वच्छता पसरते. त्यात मोजक्याच लोकांना ते आणलेले भोजनदान मिळत असल्याने भर उन्हात उभे राहून आणि वाहनांच्या येथे गर्दी करूनही काहीच उपयोग होत नाही.

याकरिता महापालिकेने पुढाकार घेऊन रस्त्यावर अन्नवाटप करण्यास प्रतिबंध करावे, अशी मागणी आंबेडकरी अनुयायी करु लागले आहेत. स्वतःचा बॅनर लावून हा जो सर्व प्रकार होत आहे, यामागे केवळ प्रसिध्दी हे एकमेव कारण असून यावर प्रतिबंध करणे आवश्यक असल्याचे मत आंबेडकरी अनुयायी करु लागले आहेत.

अनेक देवस्थानात दरोरोज हजारोंच्या संख्येने भक्त येतात. कित्येक ठिकाणी भक्तांना प्रसादाचा लाभ दिला जातो. प्रसाद म्हणून कित्येक देवस्थानमध्ये जेवणाची सोय भक्तांसाठी केली जाते. पण कुठेही रांग किंवा वाहन उभे करून भक्तांना जेवणाची सोय न करता व्यवस्थित टेबल आणि खुर्चीची सोय करुन त्यांना एका मंडपात किंवा सभागृहात जेवण वाढले जाते. मग अशीच व्यवस्था देशभरातून आलेल्या आंबेडकरी अनुयायांसाठी का होत नाही, असा सवाल आंबेडकरी अनुयायी करत आहे.

शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे रांगेत उभे करून भोजनदान करणारे किंवा शिवाजी पार्क बाहेरील रस्त्यावर वाहन उभे करून नाश्ता, जेवण किंवा फळ वाटप करण्यासाठी आलेल्या संस्था वा राजकिय मंडळींनी आपले भोजनदान शिवाजी पार्क येथील एका जागेत जमा करावे. मग येथील चहा, पाणी किंवा नाश्ता, जेवण त्यांनी स्वतः च्या हातून अनुयायांना वाढावे. मुंबई महापालिकेने देखील जेवण व्यवस्थित बसून जेवण्यासाठी शिवाजी पार्क मैदानात टेबल आणि खुर्च्याची संख्या वाढवावी. तसेच मध्यवर्ती ठिकाणी सर्वांचे जेवण, नाश्ता, पाणी, चहा एकत्रित ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून आंबेडकरी अनुयायांना भर उन्हात रांग किंवा वाहनांच्या समोर उभे राहण्याची वेळ येणार नाही. 

दुरवरून आलेले आंबेडकरी अनुयायी व्यवस्थित बसून जेवण, पाणी आणि नाश्ता करू शकतात. याची गंभीर दखल घेऊन महापालिकेने त्वरित पाऊले उचलावी, अशी मागणी आंबेडकरी जनतेकडून होऊ लागली आहे.

दरम्यान, हाच मुद्दा बौद्धचार्य आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) चे उत्तर पश्चिम मुंबईचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी सह्याद्री येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित पार पडलेल्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित बैठकीत उपस्थित केला. यावर शासनाकडून योग्य ती पाऊले उचलली जाईल, असे आश्वासन बैठकीत मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here