शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांचा गंभीर आरोप
जोगेश्वरी परिसरातील अतिक्रमण हटविणार
@maharashtracity
मुंबई: पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी गुंफेवरील तोडण्यात आलेल्या घरांचे डेब्रिज उचलण्यासाठी कंत्राटदार नेमला होता. मात्र, या कंत्राटदाराने डेब्रिज जागेवरून उचलला नाही. तसेच, डेब्रिज उचलण्याचा ८० लाखांचा खर्च मात्र कंत्राटदाराने पालिकेकडून गुपचूप वसूल करून खिशात घातला, असा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर (MLA Ravindra Waikar) यांनी केला आहे.
याप्रकरणी सखोल चौकशी करून त्याचा सविस्तर अहवाल देण्यात यावा, असे आदेश आमदार रवींद्र वायकर यांनी महापालिकेच्या संबंधित अधिकार्यांना दिले आहेत. त्यामुळे आता तो जो कोणी कंत्राटदार (contractor) आहे तो पालिकेच्या रडारवर आला आहे. या प्रकरणात चौकशी होऊन कंत्राटदार दोषी आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जोगेश्वरी परिसरातील उड्डाण पुलाखालील जागेतील, रस्ते व पदपथावरील गॅरेज, दुकाने व बेकायदा फेरीवाले यांच्यावर कारवाई करण्याबाबत व जोगेश्वरी परिसरातील विकासकामे, सुशोभीकरण आदी कामांचा आढावा घेण्यासाठी आमदार रवींद्र वायकर यांनी के/ पूर्व वार्ड कार्यालयातील संबंधित अधिकारी यांच्यासोबत गुरुवारी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत बोलताना आमदार वायकर यांनी, जोगेश्वरीमधील रस्ते, पदपथ, उड्डाणपूल आदी परिसरातील अतिक्रमणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत संबंधित पालिका अधिकाऱ्यांना फैलावर घेऊन चांगलाच जाब विचारला.
तसेच, के/पूर्व उड्डाणपुलाखालील जागांचे लवकरच सुशोभिकरणाच्या कामांबाबत आमदार वायकर यांनी पालिका अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. कल्पतरु विकासकाने अद्याप ज्या ऍमेनिटी मनपाला दिलेल्या नाहीत, त्या त्यांच्याकडून पूर्ण करुन त्याचा ताबा घ्यावा, असे आदेशही आमदार वायकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी, अनधिकृत बांधकामे, गॅरेजेस तसेच फेरीवाले यांच्यावरील कारवाईबाबत पालिका प्रशासन ‘ऍक्शन प्लॅन’ तयार करणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
त्याचप्रमाणे, जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील डिपी रोड जनतेसाठी खुला करावा. जे. व्ही. एल. आर रस्ता रुंदीकरणाच्या उर्वरित कामाचा वेग वाढविण्यात यावा, असे सूचनावजा आदेश आमदार वायकर यांनी पालिका प्रशासनाला दिले.
या बैठकीला, पालिका उपायुक्त रणजित ढाकणे, सहाय्यक आयुक्त मनिष वळंजु, एस. आर. ए व के/पूर्व विभागातील संबंधित खात्याचे अधिकारी, माजी नगरसेवक बाळा नर, विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत, महिला संघटक रचना सावंत, विधानसभा समन्वयक भाई मिर्लेकर, बावा साळवी, उपविभागप्रमुख कैलाशनाथ पाठक, बाळा साटम, जयवंत लाड, शाखाप्रमुख प्रदीप गांधी, नंदु ताम्हणकर, नितीश म्हात्रे, सुभाष मांजरेकर, मधुकर जुवाटकर, स्मिता साळसिंगीकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.