By मिलिंद माने
@maharashtracity
मुंबई: परतीच्या पावसामुळे शेतीचे झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेऊन त्यांना शासकीय मदत तातडीने मिळवून देण्याचा विडा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उचलला आहे. त्यासाठी ते रविवार दिनांक 23 रोजी संभाजीनगर दौऱ्यावर आहेत
मराठवाड्यात (Marathwada) गेल्या 15 दिवसापासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हाता – तोंडाशी आलेले पीक परतीच्या पावसामुळे पूर्ण भिजून वाहून गेले आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती पुराच्या पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे.
असे असले तरी राज्यकर्ते राज्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याची आवश्यकता नाही, अशी जाहीर विधाने करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेऊन त्यांना तातडीने मदत कशी करता येईल, याची पाहणी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रविवारी संभाजीनगरच्या (Sambhajinagar) दौऱ्यावर जाणार आहेत.
संभाजीनगरच्या दौऱ्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची (flood affected Farmers) भेट घेऊन त्यांना शासकीय मदत तातडीने कशी मिळवून देता येईल, यासाठी ठाकरे शिवसेनेची यंत्रणा कार्यान्वीत करणार आहेत.