उमेदवारांना प्रमाणपत्रांसाठी एक खिडकी सुविधा
अंधेरी (पूर्व) मतदारसंघ पोटनिवडणुक
@maharashtracity
मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या ‘१६६-अंधेरी (पूर्व) मतदारसंघाची पोटनिवडणूक ३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराने वरिष्ठांच्या आदेशाने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
या निवडणुकीसाठी २ हजार कर्मचारी, मुंबई पोलीस दल, राखीव पोलीस दल तैनात असणार आहे. दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांना मतदान केंद्रांवर येण्यासाठी लिफ्ट आणि रॅम्पची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे उमेदवारांना या काळात लागणाऱ्या सर्व आवश्यक प्रमाणपत्रांसाठी एक खिडकी ‘सुविधा’ उपलब्ध करण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या ‘१६६-अंधेरी (पूर्व) मतदारसंघाची पोटनिवडणूक ३ नोव्हेंबर रोजी
सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या कालावधीत शांततेत आणि निष्पक्षपणे पार पडेल, असा विश्वास मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी निधी चौधरी यांनी व्यक्त केला आहे. या पोटनिवडणुकीसाठी शासनाने पूर्ण तयारी केली असून अंधेरी पूर्व या मतदारसंघातील सर्व नागरिकांनी मतदान केंद्रावर वेळेत पोहोचून मतदान करावे, असेही आवाहनही निधी चौधरी यांनी केले आहे.
उमेदवारांना गुन्हेगारीची माहिती प्रसिद्ध करणे बंधनकारक
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांनी या संदर्भातील माहितीची जाहिरात वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून तीन वेळा करणे आवश्यक असणार आहे, अशी माहिती निधी चौथरी यांनी दिली.
१२ ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र आवश्यक
मतदान आणि मतमोजणी करतांना कोणतीही समस्या येणार नाही याकरिता सर्व कर्मचाऱ्यांना प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात येत आहे.
आजमितीस बहुतेक मतदारांकडे ‘मतदार कार्ड’ आहे. तथापि, ज्या मतदारांकडे ‘मतदार कार्ड’ नसेल, त्यांनी ‘भारत निवडणूक आयोग’ यांनी निश्चित केलेली व छायाचित्रासह असणाऱ्या १२ प्रकारच्या ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र मतदारांकडे असणे आवश्यक असेल.
निवडणूक तक्रारीसाठी सुविधा
निष्पक्ष आणि सुरक्षित निवडणूक होण्यासाठी आयोगाकडून तीन केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती यापूर्वीच करण्यात आली आहे. या अनुषंगाने एखाद्या नागरिकांस निवडणुकीसंदर्भात काही तक्रार असल्यास त्या नागरिकांनी ‘सी-व्हिजिल’ या ॲपवर किंवा केंद्रीय निरीक्षक सध्या राहत असलेल्या इंडियन ऑईल गेस्ट हाऊस, वांद्रे कुर्ला संकुल (बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स) या ठिकाणी त्यांची भेट घेऊन, आपली तक्रार नोंदवावी, अशी माहितीही निधी चौधरी यांनी दिली.
२ लाख ७१ हजार ५०२ मतदार
अंधेरी (पूर्व) या मतदारसंघाकरिता २ लाख ७१ हजार ५०२ मतदार संख्या असून याकरिता २५६ मतदान केंद्रे आहेत. यात २३९ मतदान केंद्र तळमजल्यावर असून १७ केंद्रे पहिल्या मजल्यावर आहेत. पहिल्या मजल्यावरील मतदान केंद्रांच्या ठिकाणी उद्वाहनाची अर्थात ‘लिफ्ट’ची सुविधा उपलब्ध आहे. या मतदारसंघात एकही असुरक्षित, संवेदनशील, अतिसंवेदनशील मतदान केंद्र नाही. ही पोटनिवडणूक १६६ – अंधेरी पूर्व या मतदारसंघात असून मुंबई उपनगर जिल्ह्याच्या उर्वरित भागात आचारसंहिता लागू नाही.