गुन्हेगारांवर तात्काळ कडक कारवाईची “आप” ची मागणी
@maharashtracity
मुंबई: वांद्रे पूर्व येथील आम आदमी पक्षाच्या कार्यालयावर मंगळवारी रात्री काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. कार्यालयाच्या काही भागाचे नुकसान झाले असून पक्षाचा एकही कार्यकर्ता दुखावला नाही. याबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तात्काळ गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन (Priti Sharma Menon) यांनी केली.
आम आदमी पार्टी (Aam Aadami party) मुंबईत ताकदीने वाढत असून महाराष्ट्रासह मुंबईत सर्वत्र पाठिंबा वाढताना दिसत आहे. आगामी महानगरपालिकेत निवडणुकांमध्ये भ्रष्टाचाराने ग्रासलेल्या मुंबई महानगरपालिकेत (BMC) आप चा झेंडा फडकवला जाणार आहे. काँग्रेस (Congress) आणि भाजपाला (BJP) आप चे यश पचवता आले नाही म्हणून कार्यालय फोडण्याची हिम्मत केली असून हे अत्यंत दुदैवी आहे, असे मत प्रीती शर्मा मेनन यांनी व्यक्त केले.
भाजप पक्षात समाजकंटकांचा भरणा आहे. काँग्रेस पक्ष संपला आहे. त्यांच्यातील भ्रष्ट भाजपामध्ये सामील झाले आहेत असून जी चांगली लोक उरली आहेत, ती आम आदमी पक्षात (AAP) सामील होत आहेत. आपल्या पक्षात घडत असलेल्या गैरव्यवहारांवर अंकुश ठेवण्याइतपत नेतृत्व काँग्रेसमध्ये उरलेले नाही. पोलिसांनी या गुंडगिरीची तात्काळ दखल घ्यावी असे, मत प्रीती शर्मा मेनन यांनी व्यक्त केले.