@maharashtracity

By अभयकुमार दांडगे

तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री आणि तेलंगणा राष्ट्र समिती या प्रादेशिक पक्षाचे अध्यक्ष ‘केसीआर’ म्हणजेच के. सी. राव (Telangana CM K C Rao) यांनी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पक्षाची एक बैठक घेऊन आपला पक्ष राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. त्या बैठकीत त्यांनी तेलंगणा राष्ट्र समिती (Telangana Rashtra Samiti) या पक्षाचे भारत राष्ट्र समिती असे नामकरण केले. या बैठकीला तेलंगणा राष्ट्र समितीचे २८३ आमदार , खासदार व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. विरोधी पक्षांची मोट बांधून विरोधी पक्षांच्या आघाडीचे नेतृत्व आपल्या हाती आले तर आपण २०२४ ला पंतप्रधान पदाचे दावेदार ठरू, असे त्यांना वाटत आहे. त्यामुळे त्यांनी एक वेगळ्या दिशेने राजकारणाची वाटचाल सुरू केली आहे.

भारतातील सरस्वतीचे एकमेव मंदिर असलेल्या बासर नजीक तेलंगणा व मराठवाड्यातील (Marathwada) सीमेवरील धर्माबाद तालुक्याला फोडून मराठवाड्यातील हा भाग तेलंगणाला जोडण्याच्या दिशेने त्यांनी तयारी सुरू केली आहे. नांदेड (Nanded) जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीचे प्रमुख सरपंच व संघटनेचे तालुकाध्यक्ष यांनी तेलंगणात यावे, त्यांच्यासाठी विकासाची गंगा वाहून आणू, अशी ग्वाही तेलंगणाकडून धर्माबाद तालुक्यातील सरपंचांना दिली जात आहे. धर्माबाद तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींच्या सरपंचांची व तेलंगणामधील मुख्यमंत्री के सी आर यांच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक बासर येथील विझडम रिसॉर्ट येथे नुकतीच पार पडली.

बासर येथे नुकत्याच पार पडलेल्या बैठकीला तेलंगणा राष्ट्र समितीचे बासर मंडळ प्रमुख व तेलंगणा राज्य बासर येथील मंडळ अध्यक्ष श्याम कोरवा, तेलंगणा आणि महाराष्ट्राचा समन्वय करून देणारे मलकापूर लिंगा रेड्डी, बासर येथील कोरवा सदानंद अण्णा तसेच माजी नगरसेवक रवींद्र शेट्टी, सरपंच संघटनेचे अध्यक्ष निदानकर व या सर्वांचे मराठवाड्याचे नेतृत्व करणारे शंकर पाटील होटृटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी धर्माबाद तालुक्यातील सरपंचांनी तेलंगणा राज्यात समाविष्ट होण्याची तयारी देखील दर्शविली. त्या सरपंचांनी तेलंगणात जाण्यास तयार असल्याचे बैठकीत जाहीर केले आहे.

दक्षिण भारताच्या टोकावर असलेल्या मराठवाड्यातील धर्माबाद तालुक्याकडे महाराष्ट्र सरकारचे नेहमीच दुर्लक्ष होते, अशी टीका गेल्या कित्येक वर्षांपासून होत आहे. तेलंगणामधील बासर येथे झालेल्या त्या बैठकीत महाराष्ट्र सरकारविरुद्ध प्रचंड रोष व्यक्त करण्यात आला. धर्माबाद तालुक्यातील अनेक सरपंचांनी यापूर्वी तेलंगणा सरकारच्या विविध विकास कामांवर प्रभावित होऊन तेलंगणामध्ये आम्हाला समाविष्ट करून घ्या, अशी मागणी थेट तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्याकडे केली होती. त्या बातमीची दखल घेऊन महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी (उद्धव ठाकरे) महाराष्ट्रातल्या सीमावर्ती भागातील सरपंचांना मुंबई येथे तातडीने बोलावून घेतले होते. त्यांच्या समस्या ऐकून घेऊन विकासासाठी ५० कोटी रुपयांचा निधी तातडीने देण्यात येईल, असे जाहीर केले होते. परंतु तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलेली ती घोषणा हवेतच विरली. आता पुन्हा या धर्माबाद मधील २५ सरपंचांनी एकजूट दाखवत तेलंगणा राज्यात आम्हाला सामील करून घ्यावे ,अशी मागणी केली आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी आर यांनी भारत राष्ट्र समिती (Bharat Rashtra Samiti) या पक्षाच्या माध्यमातून तेलंगणातील विविध योजना महाराष्ट्रात व इतर राज्यात राबविणार असल्याचा दावा देखील केला आहे. तसेच धर्माबाद तालुका तेलंगणामध्ये समाविष्ट झाल्यास त्यांचे स्वागतच होईल, असेही त्यांनी जाहीर केले आहे. मराठवाडा हा भाग पूर्वी निजामाच्या तावडीत होता. पूर्वी हैदराबाद इस्टेटमध्ये असलेल्या धर्माबाद, बिलोली व देगलूर तालुक्याला चांगला न्याय मिळत होता, अशी भावना या तालुक्यातील रहिवाशांची झालेली आहे. मराठवाड्याकडे महाराष्ट्र सरकारचे नेहमीच दुर्लक्ष होते, असा सूर नेहमीच उमटत असतो. तसेच नांदेड जिल्ह्यातील देगलूर व बिलोली या दोन्ही तालुक्यांच्या सीमा तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या आहेत. या दोन्ही तालुक्यांमधून देखील अधून मधून असाच सूर निघत असतो. बिलोली येथील एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने देखील तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. राव यांच्याकडे महाराष्ट्राबद्दल विशेषतः मराठवाड्याबद्दल नाराजी व्यक्त करून आम्हाला देखील तेलंगणात समाविष्ट करून घ्यावे, अशी लेखी मागणी केली आहे.

केसीआर यांनी राष्ट्रीय राजकारणात उडी घेतल्यानंतर स्वतःचे अस्तित्व वेगळे आहे, हे दाखवून देण्यासाठी त्यांनी तेलंगणा व महाराष्ट्राच्या सीमेवरील मराठवाड्याकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी त्यांनी तेलंगणातील काही प्रमुख राजकारणी नेत्यांवर मराठवाडा फोडण्याची जबाबदारी दिली असल्याचे बासर येथील बैठकीत स्पष्टपणे दिसून आले. मराठवाड्याचा काही भाग तेलंगणात जाणार अशी चर्चा धर्माबाद व बिलोली तालुक्यात रंगू लागली आहे.

निजामाच्या (Nizam) तावडीतून मराठवाड्याची मुक्तता करण्यासाठी बराच लढा द्यावा लागला होता. आता पुन्हा एकदा निजामाच्या नव्हे तर तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी. आर यांच्याविरुद्ध मराठवाड्यालाच लढा उभारण्याची गरज निर्माण झाली आहे.

(लेखक अभयकुमार दांडगे हे नांदेड येथील पत्रकार आहेत. त्यांना या ९४२२१७२५५२ क्रमांकावर संपर्क साधता येईल.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here