@maharashtracity
मुंबई: देशातून मान्सून काढता पाय घेत असताना तसेच मुंबई ऑक्टोबर हिटचा अनुभव घेत असतानाच शुक्रवारी मुंबई तसेच मुंबई महानगर प्रदेश परिसरात वाऱ्याच्या वेगासह पावसाने एंट्री घेतली. भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून पावसाचा अंदाज करण्यात आला होता. त्या अंदाजानुसार मुंबईतील पाऊस मध्यम स्वरुपाचा होता. शुक्रवारी शहर, आणि पूर्व पश्चिम उपनगरात सकाळपासूनच हजेरी लावली होती. दरम्यान, मुंबई वेधशाळेकडून मुंबईला शनिवारी तर पालघर ठाणे जिल्ह्यासाठी ११ ऑक्टोबरपर्यंत येलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत शहरात २२.४ तर उपनगरात ३२.६ पाऊस झाला. तर मनपाच्या स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्रांवर नोंदविण्यात आलेल्या सायंकाळी ६ वाजपर्यंतच्या नोंदीनुसार शहरात ३७.५१ मिमी, पूर्व उपनगरात ३६.३८ मिमी, तर पश्चिम उपनगरात २५.२६ मिमी इतका पाऊस झाला. यात सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत डोंबिवली पूर्वेला ११०.३ मिमी इतक्या पावसाची विक्रमी नोंद करण्यात आली.
संपूर्ण मुंबईत मध्यम सरी सुरु होत्या. कुलाबा, दादर, माहिम, माटुंगा, तसेच पवई, घाटकोपर, परळ, मुलुंड, कांदिवली बोरिवली गोरेगाव अशा बहुतांश ठिकाणी पाऊस झाला. तर ठाणे आणि नवी मुंबई भागातही जोर दिसून आला. कोपरखैराणे येथे ५६.१ मिमी, ऐरोली गावात ५०.४, ठाण्यात चिरागनगर येथे ६५.६ मिमी, ढोकळी येथे ४७.१ मिमी, कासारवावडीत ४०.५. मिमी पावसाची नोंद झाली. कल्याण पश्चिमेला ८४.८ मिमी पाऊस झाला तर विठ्ठलवाडीत ६३.७ मिमी पावसाची नोंद झाली. पनवेल येथे ५२.८२ मिमी पाऊस झाल्याचे दिसून आले.
शुक्रवारी दिवसभरात शहरात एका ठिकाणी झाड पडण्याची तक्रार तर चार ठिकाणी शॉटसर्किट, तसेच एका ठिकाणी घराचा काही भाग पडण्याची तक्रार करण्यात आली असल्याचे मुंबई महानगरपालिकेकडून सांगण्यात आले. मुंबई प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार, शुक्रवारी रायगड, रत्नागिरी तसेच नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यात मुसळधार पावसासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पाऊस अंदाज
कुलाबा वेधशाळेने आगामी २४ तासांकरीता दिलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर तसेच उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहून गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार आहे. तर राज्यभरात मेघगर्जनेसह सोसाट्याच्या वाऱ्याचा प्रभाव गुरुवारपर्यंत दिसून येईल. मुंबईत शनिवारपर्यंत तर पालघर, ठाण्यात आणि रायगड जिल्ह्यात गुरुवारपर्यंत ताशी ३०/४० किलोमीटर वेगाने वारे वाहतील. हलका पाऊसही होईल. मध्य महाराष्ट्राच्या संपूर्ण पट्टयात गुरुवारपर्यंत सारखेच वातावरण राहील.
सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि मराठवाड्याच्या काही भागात अधूनमधून वाऱ्याच्या वेगासह हलका पाऊस राहणार आहे. लातूर, उस्मानाबादमध्ये रविवारी मुसळधार पाऊस होईल. विदर्भात केवळ मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट दिसून येणार असल्याचा अंदाज करण्यात आला.