पालिका देणार प्राथमिक उपचाराचे धडे

२४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर कालावधीत प्राथमिक उपचाराबाबत जनजागृती सप्ताह

अचानक हृदय बंद पडल्यास प्राथमिक उपचाराने रुग्णाला मिळणार दिलासा

@maharashtracity

मुंबई: एखाद्या व्यक्तीचे हृदय अचानक बंद पडल्यास (heart stops working) त्याच्या नातेवाईकाने, जवळच्या व्यक्तीने तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार प्रशिक्षण घेतलेले असले व विशिष्ट पद्धतीने प्राथमिक उपचार दिल्यास ती रुग्ण व्यक्ती नक्कीच वाचू शकते. त्याबाबतचे प्राथमिक प्रशिक्षण २४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर कालावधीत मुंबई महापालिका आरोग्य विभागामार्फत (BMC Health Department) प्राथमिक जनजागृती सप्ताहामार्फत देण्यात येणार आहे.

दरवर्षी २४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या दरम्यान देशभरात ‘अचानक हृदय बंद पडणे व त्यावरील प्राथमिक उपचार’ याबाबत जनजागृती सप्ताह पाळण्यात येतो. यानुसार विलेपार्ले (पश्चिम) या परिसरात असणाऱ्या मुंबई महापालिकेच्या अखत्यारितील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रुस्तम नरसवानजी कूपर सर्वोपचार रुग्णालय येथील बधिरीकरण शास्त्र विभागाद्वारे विविध स्तरीय जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी दिली आहे.

एखाद्या व्यक्तिचे हृदय अचानक बंद पडणे, याला वैद्यकीय परिभाषेत ‘सडन कार्डियाक अरेस्ट’ (sudden cardiac attack) असे म्हणतात. ही एक धोकादायक स्थिती असून त्यावर त्वरित उपचार न केल्यास, त्या व्यक्तिचे प्राण वाचवणे खूप कठीण असते. अशा वेळेस त्या ठिकाणी जवळपास हजर असलेल्या कोणत्याही व्यक्तिने हृदय बंद पडलेल्या व्यक्तिच्या हृदयावर एका विशिष्ट पद्धतीने दाब दिल्यास त्यामुळे मेंदुचा व हृदयाचा रक्तपुरवठा सुरु राहण्यास मदत होते. या प्रक्रियेस वैद्यकीय परिभाषेत ‘कम्प्रेशन ओन्ली लाईफ सपोर्ट’ असे म्हणतात.

वेळच्यावेळी ‘कम्प्रेशन ओन्ली लाईफ सपोर्ट’
(Compression Only Life Support) दिल्यामुळे संबंधित व्यक्तिचे प्राण वाचू शकतात. हृदय बंद पडल्यापासून रुग्णालयात नेईपर्यंतचा हा कालावधी रुग्णासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे याबाबत जनसामान्यांमध्ये जागरुकता वाढविणे व व्यापक जनजागृती (awareness) होणे अत्यंत गरजेचे आहे. याच हेतुने दरवर्षी २४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या दरम्यान एससीए जागरुकता सप्ताह पाळण्यात येत असतो, अशी माहिती कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहिते यांनी दिली.

या सप्ताहादरम्यान देशभरात सर्वत्र तज्ज्ञ डॉक्टर हे ‘सीओएलएस’चे (training of COLS) प्रशिक्षण जास्तीत-जास्त लोकांना देतात. यानुसार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रुस्तम नरसवानजी कूपर सर्वोपचार रुग्णालय येथील बधिरीकरण शास्त्र विभागाच्या पुढाकाराने ‘एससीए’ जनजागृती सप्ताहादरम्यान रुग्णालयातील कर्मचारी आणि जवळच्या शाळा, महाविद्यालय व गर्दीच्या ठिकाणी ‘सीओएलएस’ चे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशीही माहिती डॉ. मोहिते यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here