मुंबई विद्यापीठाचा निषेध, छात्रभारती तीव्र आंदोलन करणार – रोहित ढाले
@maharashtracity
मुंबई: सावरकर यांचे शैक्षणिक योगदान काय? त्यावेळेसच्या पुरोहितांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना वेदोक्त मंत्र नाकारले आताही वसतीगृहाला शाहूंचं नाव नाकारलं. आजही यांना शाहूंच्या नावाचं वावडं आहे, अशा संतप्त भावना व्यक्त करत छात्र भारतीने मुंबई विद्यापीठाचा निषेध केला आहे.
आज मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाला राजर्षी शाहू महाराजांचे नाव द्यावे हा प्रस्ताव नाकारला आणि सावरकरांच्या नावाचा ठराव केला.
याविषयावर मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या भावना तीव्र आहे. शाहू महाराजांचा अवमान कदापि सहन करणार नाही. छात्रभारती तीव्र आंदोलन करणार, असा इशारा छात्र भारतीचे राज्य कार्याध्यक्ष रोहित ढाले यांनी दिला आहे.
आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहासाठी राज्यपालांनी सावरकरांचे नाव सुचवले होते व्यवस्थापन परिषदेने राज्यपालांची री ओढली. सावरकरांचे नाव द्यावे असा ठराव पास केला.
शाहू महाराजांच्या नावाचे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषेदेला वावडे आहे हे उघड झाले आहे. सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी शाहू महाराजांनी विविध वसतिगृह सुरु केली. परदेशी शिक्षण घेता यावे यासाठी शिष्यवृत्ती दिली.
हे वर्ष छत्रपती शाहू महाराजांचे स्मृतीशताब्दी वर्ष आहे. शाहू महाराजांचे निधन मुंबईत झाले. मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाला छत्रपती शाहू महाराजांचे नाव देण्यात यावे ही मागणी छात्रभारती विद्यार्थी संघटनेने केली होती.
छत्रपती शाहू महाराजांवर विद्यापीठाने अन्याय केला आहे. राज्यपाल, कुलगुरु व व्यवस्थापन परिषदेने या निर्णयाचा पुनर्विचार करावा अन्यथा छात्रभारती या विरोधात तीव्र आंदोलन करणार आहे, असं ढाले यांनी म्हटलं आहे.